सरपंचपदाच्या आरक्षण फेर सोडतीमुळे गावपुढारी, पॅनेल प्रमुखांची अवस्था गोंधळलेली ! 

दत्तात्रय खंडागळे 
Saturday, 20 February 2021

मेथवडे गावचे अनुसूचित जमातीचे सरपंचपदाचे आरक्षण कायम राहणार आहे. आपल्याच गटाचा सरपंच होण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून डावपेच आखत असलेले गाव पुढारी व पॅनेल प्रमुखांची अवस्था मात्र फेर सोडतीमुळे गोंधळल्यासारखी झाली आहे. 

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील सरपंच आरक्षणाची फेर सोडत होणार असल्याने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. मात्र, मेथवडे गावचे अनुसूचित जमातीचे सरपंचपदाचे आरक्षण कायम राहणार आहे. आपल्याच गटाचा सरपंच होण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून डावपेच आखत असलेले गाव पुढारी व पॅनेल प्रमुखांची अवस्था मात्र फेर सोडतीमुळे गोंधळल्यासारखी झाली आहे. 

याअगोदर झालेल्या सरपंच आरक्षण सोडती विरोधात काहीजणांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे सोमवारी (ता. 22) तालुक्‍यातील सरपंच आरक्षण फेर सोडत होणार आहे. तर ता. 26 रोजी या गावांची सरपंच, उपसरपंच निवड होणार आहे. फक्त मेथवडे गावचे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेले सरपंचपद हे कायम राहणार आहे. 

तालुक्‍यातील 61 गावच्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. निवडणुकीनंतर सरपंच, उपसरपंच निवडीकडे प्रमुख नेतेमंडळी, विविध पक्षांचे पदाधिकारी, गावपुढारी यांचे लक्ष लागले होते. या अगोदर 27 जानेवारी रोजी सरपंच आरक्षण सोडत झाली होती. परंतु काही जणांनी न्यायालयात धाव घेतल्याने पुन्हा सोमवारी (ता. 22) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सरपंच आरक्षणाची फेर सोडत होणार आहे. या अगोदर झालेल्या सरपंच आरक्षण सोडतीप्रमाणे गावातील पॅनेलप्रमुख, गावातील नेतेमंडळींनी आपल्याच पक्षाचे, पॅनेलचे सरपंच, उपसरपंच होण्यासाठी डावपेच आखले होते. आपले सदस्य फुटू नयेत किंवा इतरत्र जाऊ नयेत म्हणून अनेक सदस्यांना सहलीला पाठवले होते. परंतु सरपंच आरक्षणाचा गोंधळ न संपल्याने व पुन्हा सरपंच आरक्षणाची फेर सोडत होणार असल्यामुळे गावातील राजकीय पक्षांचे गाव पुढारी व पॅनेल प्रमुख पुरते गोंधळून गेले आहेत. पुन्हा सरपंच पदाचे आरक्षण कोणते निघणार, आरक्षणानुसार सदस्यांची जमवाजमव, निवडणुकीत बहुमतासाठी पुन्हा नवे डावपेच आखावे लागणार आहेत. या फेर सोडतीमुळे कोणत्या गावाचे आरक्षण बदलणार आहेत, यावरच पुढील रणनीती आखावी लागणार आहे. यासाठी या सरपंच आरक्षण सोडतीकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राजकीय समीकरणे बदलणार 
या सरपंच आरक्षण फेर सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी यामध्ये बदल झाल्यास काठावरील बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीची राजकीय समीकरणे बदलणार आहेत. काही गावांत सरपंच पदाचे आरक्षण सदस्य एकीकडे व बहुमत दुसरीकडे अशी अवस्था झाली होती. काही गावात बहुमत नसताना सरपंच सोडतीतील उमेदवार त्यांचा निवडून आल्याने निवडी अगोदरच जल्लोष केला होता. अशा गावांचे आरक्षण बदलणार का? पुन्हा आरक्षण बदलल्यास अशा अनेक गावांची राजकीय समीरणामध्ये उलथापालथ होणार आहे. 

तालुक्‍यातील मेथवडे गावचे अनुसूचित जाती जमातीचे सरपंच पदाचे आरक्षण वगळता इतर गावातील सरपंचाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी (ता. 22) होणार आहे. नवीन आरक्षणानुसार 26 फेब्रुवारी रोजी सरपंच, उपसरपंच निवडी होतील 
- अभिजित सावर्डे-पाटील, 
तहसीलदार, सांगोला 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The reservation of the Sarpanch post has raised concerns among village heads and panel heads