
दक्षिण सोलापूर (सोलापूर) ः जुळे सोलापूरमधील रूबीनगर परिसरातील गणेश बिल्डर्स क्रमांक तीन या वसाहतीत दरवर्षी पावसामुळे पाणी तुंबते अन् अनेकांच्या घरात शिरते. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करूनही यावर महापालिकेने कोणताच उपाय शोधला नसल्याने "हे किती वर्षे सहन करायचे' असा संतापजनक सवाल येथील रहिवासी करत आहेत.
या परिसरातील सर्वात जुनी असलेल्या या वसाहतीत सुमारे शंभर कुटुंबं राहतात. महापालिकेकडून या वसाहतीसाठी कोणतीच सुविधा आतापर्यंत मिळाली नाही. गेल्या अनेक वर्षापासून येथे वसाहतीसाठी स्वतंत्र रस्त्याची मागणी आहे; परंतु नगररचना व नगर अभियंता कार्यालयातील घोळामुळे कायम येथील रस्ता प्रश्न भिजत घोंगड्याप्रमाणे पडलेला आहे. किती आयुक्त, किती महापौर, किती नगरसेवक गेले तरीही साधा रस्त्याचा प्रश्न गेल्या तीस वर्षात महापालिकेने सोडवलेला नाही. रस्ता नसल्याने स्वतंत्र ड्रेनेजलाइन, पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र पाइपलाइन, अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती, गटारी आदी कोणतीच सोय येथे नाही. सध्या तर या वसाहती शेजारील जागा घेतलेल्या एका विकसकाने जमीन खांदून भले मोठे खड्डे करून ठेवल्याने वसाहतीसाठीचा रस्ताच बंद झाला आहे. याशिवाय तेथील खड्डे व मातीच्या ढिगाऱ्यांमुळे पाण्याचा लोंढा वसाहतीत मोठ्या प्रमाणात शिरून पाण्याचा तलावच तयार होत आहे.
येथे दर पावसातच पाण्याचा डोह तयार होतो. रूबी नगरच्या बस थांब्यापासून उताराने येणारे पाणी याच वसाहतीत घुसते. त्यामुळे येथील अनेक घरातून तेच पाणी शिरते. अनेकांनी घराच्या उंबरठ्याजवळ कठडे बांधले आहेत तरीही पाणी घरात शिरतेच. त्याचा परिणाम येथील रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे. अनेक घरात ज्येष्ठ नागरिक राहात असल्याने त्यांना याचा कमालीचा त्रास होत आहे. कामात अप्रामाणिकपणा दाखवणारे प्रशासन घरपट्टी वसुली मात्र प्रामाणिकपणे करत आहे. त्यामुळे घरपट्टी वसुलीसाठी घरे हुडकत हिंडणारे सुविधा देताना कुठे जातात, असा सवाल येथील रहिवासी विचारत आहेत. मतदानावेळी मतं मागणारे नगरसेवक, आमदार, खासदार पुन्हा पाच वर्षानीच येथे येतात. नगरसेवकांनी तरी किमान आपल्या प्रभागातील समस्या जाणून घ्याव्यात, अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.
गणेश बिल्डर्स येथील रहिवासी मंगल नळगे म्हणाल्या, मंगळवारी रात्री व बुधवारी पडलेल्या पावसाचे पाणी आमच्या घरात शिरल्याने घरातील सर्व वस्तू भिजून गेल्या. धान्यासह अंथरुण, पांघरुण, कपडे भिजले. घरातील पाणी बाहेर काढताना बराच त्रास झाला. यावर नगरसेवक, आमदार व महापालिकेने ठोस उपाय करावा. दरवर्षी आम्हाला पावसाच्या पाण्याचा त्रास होत आहे.
सुवर्णा अवसरे म्हणाल्या, गेल्या 30 वर्षापासून या वसाहतीमधे आम्ही राहतो. दरवर्षी पावसाळ्यात येथे पाण्याचा तलावच तयार होतो. आमच्या घरात पाणी घुसते. ते काढताना आम्हाला तारेवरची कसरतच करावी लागते. महापालिका प्रशासनाला गेल्या 30 वर्षापासून निवेदने देऊनही सुविधा दिल्या जात नाहीत.
कस्तुरी हिप्परगी म्हणाल्या, या वसाहतीत दूरवरून उताराने येणारे पाणी घुसत असल्याने आमच्या घरातही पाण्याचा तलावच तयार होतो. महापालिकेने याबाबत पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु महापालिका डोळेझाक करत असल्याने अनेक वर्षापासून आम्ही येथे नरकयातना भोगत आहोत. निवडणुकीवेळी मते मागणाऱ्यांनी किमान एकदा तरी येथे भेट देऊन प्रश्न निकाली काढावा.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.