esakal | सन्मानपूर्वक वापरच ठरेल मराठीचा आदर : यिनचा "मराठी भाषा गौरव" परिसंवाद 

बोलून बातमी शोधा

yin logo new.jpg}

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सकाळ "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क" (यिन)च्या वतीने सकाळ शहर कार्यालयात "मराठी भाषा गौरव" परिसंवाद आयोजित करण्यात आला

सन्मानपूर्वक वापरच ठरेल मराठीचा आदर : यिनचा "मराठी भाषा गौरव" परिसंवाद 
sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूरः युवकामध्ये मराठीचा कमी होत असलेला संवाद व हरवत चालले ग्रामीण बोलीतील शब्द जतन करत मराठीला पून्हा एकदा सन्मानपूर्वक वैभव आत्मसात करून देण्याचे कार्य पुढील काळात व्हावे असा सुर येथील यीनच्या वतीने मान्यवरांच्या परिसंवादात निघाला. 
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सकाळ "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क" (यिन)च्या वतीने सकाळ शहर कार्यालयात "मराठी भाषा गौरव" परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा विस्तार यामुळे आभासी संवाद वाढला आहे. तरुणाईची भाषा बदलत चालली आहे. युवा वर्ग मराठी साहित्य, वाडःमयापासून दूर होत चालला आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक ग्रामीण व बोलीभाषेतील शब्द लुप्त होत चालले आहेत. हे सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. मराठीच्या जागरासोबतच दैनंदिन जीवनातील संवाद व व्यवहारात मराठीचा सन्मानपूर्वक वापरच ठरेल मराठीचा आदर अशा भावना यावेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या. यात डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. एस. बी. क्षीरसागर, डॉ. लता बामणे, प्रा. हनुमंत मते, डॉ. सुहास उघडे, डॉ. राजशेखर शिंदे, प्रा. मोहन चव्हाण आदी मान्यवर तसेच काजल चव्हाण, आकांक्षा सोनवणे, अतिश पाटोळे, पंकज मुळे हे विदयार्थी सहभागी झाले होते. 

 मराठीचा सर्वाधिक वापर
सोलापूर मराठी भाषा समृद्ध आहे. एका शब्दांसाठी मराठी भाषेत अनेक समानार्थी शब्द आहेत. मराठी भाषेची थोरवी आणि माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपलीच आहे. आपल्या रोजच्या व्यवहारात मराठीचा वापर अधिकाधिक कसा होईल यासाठी आपण जागरूक असलो पाहिजे. विद्यापीठाच्या कार्यालयीन कामकाजात,पत्रव्यवहारात मराठीचा सर्वाधिक वापर होतो. 
- डॉ. शिवाजी शिंदे, सहायक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर 

 मातृभाषेचे जतन करणे हे आपले कर्तव्यच 
मराठी भाषा सामान्यांची भाषा आहे.संवादाची भाषा आहे. व्यक्ती मातृभाषेतूनच विचार करते. इतर भाषांचा भाषांचा सन्मान आहेच पण मराठी आग्रह धरायला हवा. आपल्या कुटुंबात, कामाच्या ठिकाणी मराठीतूनच संवाद आणि व्यवहार झाला पाहिजे. मातृभाषेचे जतन करणे हे आपले कर्तव्यच. 
-डॉ. एस. बी. क्षीरसागर, प्राचार्य, दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर 

 मुल्यांची जपणूक मराठी भाषेतूनच
माणूस त्याच्या भाषेतून व्यक्त होतो. त्याच्या वागण्याबोलण्यातून त्याची ओळख होते. मराठीत भाषेत आपुलकी आहे, गोडवा आहे. कुटुंबसंस्था आहे. तोपर्यंत मराठी भाषा टिकणारच आहे. संत महापुरुषांनी मुल्यांची जपणूक मराठी भाषेतूनच केली. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा मराठी भाषेमुळेच संक्रमित झाला. 
डॉ. लता बामणे, मराठी भाषा विभागप्रमुख, दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय,सोलापूर 

 मराठीला जगवण्याचं कर्तव्य 
बहुभाषिक समाजात राहूनसुद्धा मराठीला जगवण्याचं कर्तव्य आपलं आहे. अनेक परकीय आक्रमणातूनसुद्धा मराठी भाषा टिकली आहे. संतांनी मराठीचा जागर केला आहे. महानुभव पंथाने मराठीला एक दर्जा दिला आहे. संत नामदेव पंजाबमध्ये मराठी भाषा घेऊन गेले. मराठीचे महत्व टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. 
-प्रा. हनुमंत मते, मराठी भाषा विभागप्रमुख, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर 

 मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी
भाषा ही वैचारिक देवाणघेवाणीचे प्रभावी माध्यम आहे आणि यासाठी मराठी भाषा अंत्यंत सुलभसोपी आहे. मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षणव्यवस्थेत मराठीचा वापर वाढला पाहिजे. डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम हे याचे उत्तम उदाहरण आहेत. मातृभाषेतूनच त्यांचे शिक्षण झाले होते. 
-प्रा. सुहास उघडे, वसुंधरा महाविद्यालय, सोलापूर 

 मराठी भाषेला हजारो वर्षांची परंपरा 
भाषा ही जीवनव्यवहार प्रकट करते. संतांनी आत्मानुभव मराठीमधूनच मांडले. मराठी भाषा समृद्ध आहे. म्हणूनच ब्रिटिशांनीसुद्धा मराठी शब्दकोश तयार केला. तुकाराम महाराज, रामदास स्वामींनी मराठीतूनच उपदेश केला आहे. मराठी भाषेला हजारो वर्षांची परंपरा आहे. मराठी भाषा कधीच दीन, मृतप्राय होऊ शकत नाही. 
-डॉ. राजशेखर शिंदे, मराठी भाषा विभागप्रमुख, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर 

मातृभाषेतूनच शिक्षण सहज व सुलभ
मातृभाषेतूनच शिक्षण सहज व सुलभ होते. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध उच्च पदांना गवसणी घातली आहे. आधुनिक काळात जागतिकीकरणामुळे इंग्रजीचे महत्व वाढते आहे. मात्र आपली मातृभाषाही तितकीच महत्वाची आहे. भाषा आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा घटक आहे. भावना मातृभाषेतूनच पोहोचतात. 
-प्रा. मोहन चव्हाण, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर 

 तरुणाईची भाषा बदलते आहे.
आधुनिक जीवनशैलीमुळे तरुणाईची भाषा बदलते आहे. त्या-त्या काळानुसार जवळच्या भाषेचा प्रभाव आपल्या भाषेवर होतच असतो. असे अनेक बदल मराठीने स्वीकारले. मात्र मराठीचे महत्व आजही तेवढेच आहे. मराठी भाषेत सखोल तत्वज्ञानही आहे आणि ग्रामीण, बोलीभाषेतील शब्दही आहेत. मराठी भाषेत जेव्हढे शब्दकोष आहेत तेवढे भारतातील इतर कोणत्याच भाषांमध्ये नाहीत. मराठी भाषेतला पहिला शब्दकोश छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला. 
-डॉ. सुहास पुजारी, मराठी भाषा विभागप्रमुख, संगमेश्वर महाविद्यालय,सोलापूर