
सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. सोलापूर शहरातील रुग्णसंख्या कमी होत असून ग्रामीण भागात वाढत आहे. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर देऊन ग्रामीण भागातील मृत्यूदर वाढू देऊ नका, असे निर्देश महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हा नियोजन भवनमध्ये कोरोनाच्या आढावा बैठकीत श्री. थोरात बोलत होते.
यावेळी महिला व बाल विकासमंत्री डॉ. यशोमती ठाकूर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ उपस्थित होते.
श्री. थोरात म्हणाले, राज्यात परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे संसर्ग वाढत आहे. मुंबई कंट्रोलमध्ये असली तरी इतर शहरात संसर्ग वाढत आहे. शहरात सध्या रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. ही आनंदाची बाब आहे. ग्रामीण भागातील तपासणी चाचण्यांचा वेग वाढविल्याने रूग्णसंख्या वाढत आहे. रुग्ण वाढले तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. जिल्हा प्रशासनाने रुग्णांवर वेळेत उपचार करून मृत्यूदर आटोक्यात ठेवण्यावर भर द्यावा. पुढील 100 दिवसांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.
सोलापुरातील कोरोना स्थिती व उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी श्री. थोरात, डॉ. ठाकूर, पालकमंत्री भरणे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती देण्यासाठी या तिन्ही मंत्र्यांची पत्रकार परिषद आज सातरस्ता येथील नियोजन भवनात झाली. कोरोनावरची लस प्रत्यक्षात कधी उपलब्ध होणार? राज्य सरकारची काय तयारी आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर महसूल मंत्री थोरात यांनी हे उत्तर दिले. कोरोनाला हरवण्यासाठी किंवा कोरोनापासून बचाव करण्यासाठी तुम्ही जर लसची वाट पाहत असाल तर तूर्तास तरी आपल्या हातात लस मिळणार नसल्याचे महसूल मंत्री थोरात यांच्या विधानातून स्पष्ट झाले आहे.
महिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे - डॉ. ठाकूर
पुरुष मोठ्या प्रमाणात कामानिमित्त बाहेर जातात. त्यांना संसर्ग झाल्यास घरातील इतरांनाही बाधा होते. महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याने त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याच्या सूचना डॉ. ठाकूर यांनी केल्या. विडी कामगार महिलांच्या कामे करून आधारकार्डसाठी त्यांच्या बोटाचे ठसे येत नाहीत. त्यांच्या बायोमेट्रीकच्याही तक्रारीचे निवारण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यांनी पॉस्को, घरगुती हिंसा केसेसबाबत माहिती घेतली. अंगणवाडीसेविका मानधन वाढविणे आणि त्यांना एक तारखेला पगार करणे याबाबतीत प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
रिक्त पदे, औषधासाठी सहकार्य करा
जिल्ह्यात 10 हजार 209 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी 517 मयत झाले असून 6675 रूग्ण बरे होऊन घरी गेले तर 3017 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाला सर्व बाबतीत नागरिकांचे सहकार्य मिळत असून कोविड हॉस्पिटल, आरोग्यातील रिक्त पदे, औषधे, म्ब्यूलन्ससाठी सहकार्य करण्याची अपेक्षा पालकमंत्री भरणे यांनी श्री. थोरात यांच्याकडे व्यक्त केली.
संपादन - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.