वारी सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखून काम करावे : अप्पर जिल्हाधिकारी

Kartiki Meeting
Kartiki Meeting

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कार्तिकी वारी ही प्रतिकात्मक स्वरूपात करण्यात येणार आहे. ही वारी सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून योग्य नियोजन करावे, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजय जाधव यांनी दिल्या. 

कार्तिकी वारी नियोजनाबाबत सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. 

अप्पर जिल्हाधिकारी श्री. जाधव पुढे म्हणाले, कार्तिकी वारी ही कोरोनाच्या संकटकाळात तसेच आचारसंहितेच्या कालावधीत पार पडत आहे. याबाबत सर्व संबंधित विभागांनी आपणास दिलेली जबाबदारी 24 नोव्हेंबरपर्यंत पार पाडण्यासाठी नियोजन करावे. मंदिर समितीने महापूजा व इतर विधी पार पाडताना योग्य नियोजन करावे. कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून आवश्‍यक आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवण्याबाबत नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय निवासस्थानाचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. तसेच तेथे नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करून संबंधितांना ओळखपत्रे द्यावीत. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने चंद्रभागा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. नगरपालिकेने स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच आवश्‍यक तिथे बॅरिकेडिंग करावे अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. 

अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या नियोजनाप्रमाणेच कार्तिकी वारीचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी पंढरपूरमध्ये सुरक्षिततेसाठी सुमारे 1800 पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे. शासकीय निवासस्थान येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने बॅरिकेडिंग करून घ्यावे. तसेच मंदिर समितीने व नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रात आवश्‍यक ठिकाणी बॅरिकेडिंग करावे. वारी कालावधीत सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

आरोग्य विभागाने शासकीय निवासस्थान व श्री विठ्ठल-रक्‍मिणी मंदिर येथे तज्ज्ञ डॉक्‍टरांसह वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. ऑक्‍सिजन, रक्तपुरवठा तसेच मुबलक औषधसाठा उपलब्ध राहील याबाबत नियोजन करावे. तसेच दर्शनी भागावर कोरोनाबाबत जनजागृतीपर फलक लावावेत. नगरपालिकेने स्वच्छ पिण्याचा पाणीपुरवठा, प्रदक्षिणा मार्गावरील आवश्‍यक ठिकाणी रस्ते दुरुस्ती, मठांचे निर्जंतुकीकरण करावे तसेच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मंदिर समितीने पूजेला उपस्थित राहणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधितांची आरोग्य तपासणी करून घ्यावी. महावितरणने यात्रा कालावधीत सुरक्षित व अखंडित वीजपुरवठा राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी या वेळी दिल्या. 

या वेळी बैठकीत राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे विभाग, बीएसएनएल, उपप्रादेशिक परिवहन आदी विभागांचाही आढावा घेण्यात आला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com