या बेफाम रिक्षाचालकांवर अंकुश लावणार कोण? पूर्वभागातील वाहतूक ठरतेय जीवघेणी

Rikshwa
Rikshwa

सोलापूर : शहरातील काही बेफाम रिक्षाचालकांची डोकेदुखी लॉकडाउननंतर पुन्हा सुरू झाली आहे. त्यातल्या त्यात कन्ना चौकातून पूर्व भागातील विविध भागांत ये-जा करणाऱ्या रिक्षाचालकांवर कोणाचाच अंकुश नसल्याचे दिसून येत असून, कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाही भरधाव वेगातील तीन आसनी रिक्षांमध्ये सहा-सात प्रवासी घेऊन बिनधास्त भाडे मारले जात आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे लक्ष आहे ना पोलिसांचे. अशाने कोरोनाचा संसर्ग कमी होणार कसा, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

महापालिका परिवहनची बससेवा कुचकामी ठरत असल्याने कन्ना चौकातून जुने विडी घरकुल, शांती चौक येथून गोदूताई परुळेकर वसाहत व गेंट्याल चौक मार्गे एमआयडीसी, नीलमनगर, विनायकनगर व गोदूताई परुळेकर वसाहत या मार्गांवर कामगारांना ये-जा करण्यासाठी रिक्षा हा एकमेव पर्याय राहिला आहे. त्यामुळे चौका-चौकांमध्ये व जेथे अधिकृत रिक्षा थांबे नाहीत, अशा ठिकाणी भर रस्त्यांवर रिक्षांची गर्दी ही रहदारीला अडथळ्याची व जीवघेणी ठरत आहे. अरुंद रस्त्यांवरूनही भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षा या पादचारी, दुचाकी व सायकलस्वारांसाठी धोकादायक ठरत आहेत. 

"दिसला प्रवासी की मार ब्रेक' प्रवृत्तीमुळे वाढला धोका 
भरधाव वेगात असलेल्या रिक्षामागे एखादा दुचाकीस्वार जात असेल तर त्याचा प्रवास धोकादायक ठरत आहे. कारण, भरधाव रिक्षाचालकाला रस्त्याच्या कडेला एखादा प्रवासी दिसला की, तो मागेपुढे येणाऱ्या वाहनांचा विचार न करताच खरकचून ब्रेक लावतो, त्यामुळे मागील वाहनधारकाला तोंडघशी पडण्याची वेळ येते. जाब विचारला की वरून रिक्षाचालकाची अरेरावी ऐकून घेण्याची किंवा प्रसंगी वाद घालत बसण्याची वेळ दुचाकीस्वारांवर येते. 

आता पोलिसांचे लक्ष्य विनामास्कवाले 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता पोलिसांनी वाहनांवर फिरणाऱ्या विनामास्कवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे. त्यात कारमधून जाणाऱ्या विनामास्कवाल्यांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र बेफाम वेगाने, खच्चून प्रवासी भरून धावणाऱ्या रिक्षाचालकांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. 

उद्दामपणाचा कळस गाठणाऱ्या रिक्षाचालकांवर वरदहस्त कोणाचा? 
याबाबत शिवबा समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष निरंजन बोद्धूल म्हणाले, एकतर 50 टक्के रिक्षाचालक विनापरवाना रिक्षा चालवत आहेत. अनेक टपोरी मुले रिक्षाचालक बनली असून, रस्त्यावर जणू शर्यत लावावी अशा वेगाने रिक्षा पळवत प्रवासी व रस्त्यावरील नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. पोलिसांची दोन दिवस कारवाई चालते मग पुन्हा या रिक्षाचालकांच्या मुजोरीकडे कोणी लक्ष देत नसल्याने या बेफाम रिक्षाचालकांवर वरदहस्त कोणाचा आहे, असा प्रश्‍न पडतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com