
पेट्रोल व डिझेल या इंधनापाठोपाठ आता घरगुती गॅसचे दरही वाढल्याने सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय नागरिक मात्र हतबल झाले आहेत. त्यांचे आर्थिक गणितच (बजेट) पार कोलमडून पडले आहे.
केत्तूर (सोलापूर) : पेट्रोल व डिझेल या इंधनापाठोपाठ आता घरगुती गॅसचे दरही वाढल्याने सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय नागरिक मात्र हतबल झाले आहेत. त्यांचे आर्थिक गणितच (बजेट) पार कोलमडून पडले आहे. केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे, निवेदने देणे सुरू असून सर्वसामान्य नागरिकांची "मन की बात' ऐकून केंद्र सरकारने याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
पेट्रोल व डिझेलचे दर गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने वाढतच आहेत. त्यातच अर्थसंकल्प झाल्यानंतर गॅसचे दरही वाढले आहेत. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे वाहतुकीचे (ट्रान्स्पोर्ट) दरही वाढणार असल्याने महागाई वाढण्याला खतपाणी मिळणार आहे.
केंद्र सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला. त्याचा काहीही फायदा ग्रामीण भागाला होणार नसल्याने महागाईच्या सापळ्यात अडकलेल्या सर्वसामान्य जनतेच्या हाताला "अर्थ'च राहिला नसल्याने त्यांचे सर्व संकल्प मात्र "अर्थ'हीन झाले आहेत. गतवर्षी कोरोना महामारीमुळे बहुतेक जणांच्या नोकऱ्या गेल्या किंवा अडचणीत आल्या; तसेच नैसर्गिक संकटाने शेती उद्योगाला राम उरला नाही. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था गंभीर झाली आहे, याकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही.
घरगुती गॅसचा दर चक्क 783.50 रुपयांवर जाऊन पोचला आहे. आता गॅस वापरणे परवडणारे नाही. त्यातच रॉकेलही मिळत नाही, त्यामुळे सगळी बोंबाबोंब झाली आहे.
- ऊर्मिला माने,
गृहिणी, केत्तूर
कोरोनाच्या काळात संपूर्ण जग ठप्प होते. त्यानंतर हळूहळू सर्वकाही सुरळीत होत असतानाच आता महागाईच्या संकटाने विरजण घालण्याचे काम केले आहे. अगोदरच बहुतांशी युवक बेरोजगार आहेत. त्यातच वाढत्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यामुळे आर्थिक घडी मात्र विस्कटत आहे.
- राहुल इरावडे,
युवक
इंधन, गॅस याबरोबरच खाद्यतेलाच्या (गोडेतेल) दरातही वरचेवर वाढत होत असल्याने यालाच "अच्छे दिन' आले म्हणतात की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
- शुभांगी विघ्ने,
गृहिणी
पेट्रोल, डिझेल तसेच गॅसच्या दरावर केंद्र शासनाने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. फेब्रुवारी महिन्यात गॅसच्या दरात दोनदा वाढ झाली असून, गॅस 75 रुपयांनी वाढला आहे.
- उदय माने,
युवक
दर महिन्याच्या एक तारखेला गॅसच्या किमती जाहीर होतात. फेब्रुवारीच्या 1 तारखेला गॅस दर जाहीर होत असतानाच 4 फेब्रुवारी रोजी 25 रुपयांची वाढ झाली व आता 15 फेब्रुवारीला एकदम 50 रुपयांची वाढ झाली आहे. हा सर्वसामान्यांना शासन "जोर का झटका जोरसेच' देत आहे.
- श्रीकांत साखरे,
नागरिक, केत्तूर
संपादन : श्रीनिवास दुध्याल