महावितरणकडून जनतेची लूट; संभाजी आरमारने केला आरोप 

संतोष सिरसट 
Monday, 7 September 2020

विजबिल भरुन करावे सहकार्य 
लॉकडाऊनच्या काळात महावितरणने विज विकत घेऊन त्याचे वितरण ग्राहकांना केले आहे. कोरोनाच्या काळातही नियमित वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अखंड कार्यरत होते. नागरिकांनी वापरलेल्या बिजेचेच बिल महावितरणने दिले आहे. त्यामुळे ते बिल भरुन महावितरणला ग्राहकांनी सहकार्य करावे. विज बिल माफीचा निर्णय ही धोरणात्मक बाब आहे. 
ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण. 

सोलापूर ः महावितरणने सर्वच ग्राहकांना त्यांच्या वापरापेक्षा जादा वीज बिल आकारले आहे. असे केल्याने महावितरण जनतेची लूट करत असल्याचा आरोप आज संभाजी आरमारने केला. संभाजी आरमारच्यावतीने जुनी मिल कंपाऊंडमधील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यावेळी आरमारच्यावतीने हा आरोप करण्यात आला. हा आरोप करतानाच वीजबिल माफ करण्याची मागणीही त्यांनी केली. 

वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी संभाजी आरमारच्या घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांना हा आरोप केला आहे. महावितरणने नफेखोरी न करता जनतेला वीज बिल माफी द्यावी अन्यथा महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात इशाराही देण्यात आला. 

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात सरकारने टाळेबंदी घोषित केली होती. या कालावधीमध्ये उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने वीज बिल भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांच्या अंतराने आलेल्या वीज बिलाच्या अवाढव्य रक्कमेने जनतेला 440 व्होल्टचा झटकाच बसला आहे. सरासरीपेक्षा दुप्पट तिप्पट बिल आल्याचे प्रकार सर्रास सर्वत्रच निदर्शनास आले आहेत. या अव्वाच्या सव्वा बिलाच्या रक्कमेने रोगराई, बेरोजगारीने त्रस्त असलेल्या जनतेचे कंबरडेच मोडले आहे. सर्व उद्योग वेगवेगळ्या माध्यमातून देशाकरिता योगदान देत असताना महावितरण मात्र अशा संकटसमयी वाढीव वीज बिलाच्या माध्यमातून नफेखोरी करत असेल तर ते अशोभनीय आहे. त्यामुळे या घंटानाद आंदोलनाद्वारे नफेखोरीत रममाण झालेल्या वीज कंपनीला जाग आणून देण्याचा प्रयत्न संभाजी आरमारने केला आहे. यावेळी कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे, जिल्हा संघटक अनंतराव नीळ, संजय सरवदे, उपजिल्हाप्रमुख राजेश पाटील, उपशहरप्रमुख सागर ढगे, विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के, मल्लिकार्जुन पोतदार, कार्यालय प्रमुख सुधाकर करणकोट, राजु रच्चा, सागर सासणे, सागर दासी, अक्षय अच्युगटला, व्यंकटेश मद्राल, एजाज नाईकवाडी, नागराज परकीपंडला, प्रवीण द्यावरकोंडा, अमीत जोगदंड, राजु आखाडे, गणेश ढेरे, अविनाश वीटकर, राहुल कांबळे उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery of people from MSEDCL; Allegations made by Sambhaji Aramar