
ठळक बाबी...
सोलापूर : महापालिकेतील सात विषय समित्यांच्या 22 डिसेंबरला निवडी आहेत. त्यात शिवसेनेने महिला व बालकल्याण समिती घेतली असून कॉंग्रेसला दोन, एमआयएमला दोन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस व वंचित बहूजन आघाडीला प्रत्येकी एक समिती देण्याचे ठरले आहे. मात्र, राज्यातील विधानसभा, लोकसभा, पदवीधर व शिक्षक आमदारकीसाठी ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र भूमिका घेऊन स्वबळावर निवडणूक लढविली. या पार्श्वभूमीवर गटनेते आनंद चंदनशिवे यांनी पक्षाचे सर्वेसर्वा ऍड. आंबेडकर यांच्याकडे विषय समित्यांबाबत विचारणा केली आहे. उद्या (ता. 21) सभापतीपदांसाठी अर्ज करण्याची मुदत असल्याने वंचितची भूमिका उद्या (सोमवारी) दुपारपर्यंत ठरणार आहे.
ठळक बाबी...
सत्ताधारी भाजपला विषय समित्यांपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील मतभेद दूर करुन एमआयएम व वंचित बहूजन आघाडीला सोबत घेऊन विषय समित्यांचा तिढा सोडविण्यासंर्दभात आमदार संजय शिंदे यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर रविवारी (ता. 20) महाविकास आघाडीतील नेत्यांनी (गटनेते) दोनवेळा बैठका घेतल्या. या बैठकीत कोणत्या समित्या कोणाकडे राहतील, कोण संभाव्य सभापती असेल, यासंबंधी निर्णय झाला. तत्पूर्वी, एमआयएमने महिला व बालकल्याण समिती द्यावी, अशी भूमिका घेतली. त्यानंतर एमआयएमला दोन समित्या देण्याचे निश्चित झाले. मात्र, शिवसेना आणि कॉंग्रेसने महत्त्वाच्या समित्या घेतल्याने उर्वरित समित्यांसाठी तीन पक्ष तयार होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेनेसोबत हे पाच पक्ष एकत्र येणार नाहीत, असा ठाम विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे 'भाजपने एकला चलो रे'ची भूमिका घेत स्वबळावर निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. तर पाचपैकी कोणताही पक्ष सोबत आल्यास त्याचे समाधान करण्याचीही तयारी भाजपने ठेवली आहे. आता वंचित बहूजन आघाडीच्या भूमिकेवर विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध होणार की मतदान घ्यावे लागणार हे निश्चित होणार आहे.