आषाढी वारीबाबत पोलिस प्रशासनाची 'ही' भूमिका महत्त्वाची 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

11 पोलिस कोरोनामुक्त 
पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पंढरपूरप्रमाणे जिल्ह्यात इतरत्र देखील आयुर्वेदिक काढा देण्यात येत असून च्यवनप्राशचे देखील वाटप करण्यात येणार आहे. तसेच 20 हजार हायड्रोक्‍सिक्‍लोरिक्विन गोळ्यांचा साठा तयार आहे. जिल्ह्यातील 13 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 11 जण कोरोनामुक्त झाले असून उर्वरित दोघांची तब्येत देखील ठणठणीत असल्याचे श्री. पाटील यांनी नमूद केले. 

पंढरपूर (जि. सोलापूर) : दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदाची आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरवली जावू नये, अशीच पोलिस प्रशासनाची भूमिका आहे. याविषयी उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत काही दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत मत मांडले असल्याची माहिती जिल्हा पाल्लिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज सायंकाळी येथे दिली. 
श्री. पाटील यांनी आज सायंकाळी येथील शहर पोलिस ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, शहर पोलिस निरीक्षक अरुण पवार आदी उपस्थित होते. 
यंदाची आषाढी एकादशी एक जुलै रोजी आहे. त्याआधी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदा आषाढी यात्रा होणार किंवा नाही याविषयी संभ्रमावस्था आहे. शासनाने अंतिम निर्णय घेतला नसला तरी याबाबत मते जाणून घेण्यासाठी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाशी संवाद साधला होता. 
श्री. पाटील म्हणाले, कोरोनाचा संसर्ग सध्या वाढत असून वारीस राज्यभरातून लाखो भाविक दाखल झाल्यास आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. यामुळे पोलिस प्रशासनाने वारी भरवली जावू नये अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, शासनाने नागरिकांना आपल्या गावी जाण्यास परवानगी दिली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातून रोज दोन ते अडीच हजार लोक आपल्या गावी जात असून 500 ते 600 लोक जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यांच्या तपासणीसाठी 28 मार्गावर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने लोक आपल्या गावी परत येत असल्याने येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे. यासाठी नागरिकांनीच स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. 
चौथ्या लॉकडाउनमध्ये मोठी शिथिलता देण्यात आली असून आता पोलिसांची भूमिका देखील बदलली असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This role of the police administration is important regarding Ashadi Wari