esakal | उर्दूच्या रुबाबाला लाभली मनमिळाऊ मराठीची साथ 

बोलून बातमी शोधा

nasiroddin alandkar.jpg}

नासिरोद्दीन आळंदकर त्यांच्या मनात मराठी रुजण्याचा प्रवास सांगत होते. 

solapur
उर्दूच्या रुबाबाला लाभली मनमिळाऊ मराठीची साथ 
sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः उर्दू बोलताना सहजपणे मित्रांच्या संवादातून मराठीने मला जवळ घेतले व त्याच प्रेमाने माझ्या मनातील काव्याची भाषा मराठी बनत गेली. आता आमच्या घरात दुसऱ्या पिढीत मराठीने स्वतःचे स्थान बनले. हे शब्द आहेत साहित्यिक नासिरोद्दीन आळंदकर यांचे. 
नासिरोद्दीन आळंदकर त्यांच्या मनात मराठी रुजण्याचा प्रवास सांगत होते. 
आमच्या कुटंबात सर्वांचे शिक्षण उर्दूत झाले. मी देखील सर्व शिक्षण उर्दूमध्ये घेतले. नंतर मी पुढील शिक्षण घेण्यासाठी उमरग्यात गेलो, तेव्हा मराठी भाषिक मित्रांचा गराडा पडला. थोडे समजून घेत माझे मन कधी मराठीमय झाले कळालेच नाही. सेंडऑफच्या दिवशी अचानक मला थेट मराठीतच कविता सुचली. मनाची भाषा मराठी झाली की काव्य सुचू लागल्याचा अनुभव आला. एक दिवस सोलापुरात दृष्टीबाधितांचा विवाह सोहळा पाहिला अन मराठी काव्य माझ्या मनातून स्फुरले. 
'जरी आंधळा मी तुला पाहतो, ही सृष्टी मी दृष्टीविना पाहतो। मी माझ्यामध्ये सारे ब्रम्हांड पाहतो हे शब्द ओघळले.' 
घरीदेखील मी असे शब्द बोलू लागलो, तर घरचे हसायला लागले. माझ्या मराठी शिकण्याचे त्यांना कौतुक होते. आमच्या घरात असलेल्या व्यवसायामुळे ग्राहकांशी मराठी संवाद अधिक आत्मियता वाढवणारा होत चालला होता. वडिलांनीदेखील अन्य भाषा शिकण्याबद्दल कधीही थांबवले नाही, तर उलट प्रोत्साहनच दिले. मराठी आता माझ्या काव्यामधून स्फुरत होती, म्हणजे ती माझ्या मनाची अभिव्यक्तीची भाषा बनली होती. 
एकदा माझ्या घरी काही पाहुणे मंडळी कर्नाटकातून आली. त्यामध्ये एक मराठी भाषिक होते. त्यांना जेवण्याबद्दल काय बोलावे समजेना. तेव्हा मी उपस्थित उर्दू भाषिकांना मी आता मराठीत बोलतो, असे सांगून मराठी भाषिक पाहुण्यांना मोकळेपणाने जेवणाबद्दल विचारपूस केली व वाढले. ते अत्यंत आनंदित होऊन जेवू लागले. भाषेची ही आत्मियता मने कशी जोडते, याचा अनुभव मी घेतला. 

हिंदी, उर्दूबरोबरच मराठीलाही स्थान 
विशेष म्हणजे माझ्या घरात उर्दू व हिंदीचा वापर होतोच. पण पत्नी तेलगू भाषिक आहे. मी व माझे भाऊ मराठी बोलतो. त्या सोबत सोलापुरी बोलीदेखील वापरात येते. उर्दू भाषेचा लहजा समजून घेत मराठी मात्र मनात रुजली आहे. आजही माझे लेखनांची प्रेरणा मराठीतून अधिक सक्षमपणे व्यक्त होते. माझ्यासोबत आता माझा मुलगादेखील मराठी उत्तम बोलतोय.