esakal | विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर राष्ट्रवादीत उभी फूट ! "विठ्ठल'च्या निवडणुकीचे रणशिंगही फुंकले 

बोलून बातमी शोधा

Pdr.ncp}

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरून तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले झाले आहेत. तालुका अध्यक्षपदावरून ऍड. दीपक पवार यांची तडकाफडकी केलेल्या उचलबांगडीमुळे पक्षातील अंतर्गत खदखद समोर आली आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तालुका अध्यक्षपदाची केलेली निवड रद्द करावी, अशी मागणी पक्षातील अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. 

solapur
विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर राष्ट्रवादीत उभी फूट ! "विठ्ठल'च्या निवडणुकीचे रणशिंगही फुंकले 
sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरून तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले झाले आहेत. तालुका अध्यक्षपदावरून ऍड. दीपक पवार यांची तडकाफडकी केलेल्या उचलबांगडीमुळे पक्षातील अंतर्गत खदखद समोर आली आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तालुका अध्यक्षपदाची केलेली निवड रद्द करावी, अशी मागणी पक्षातील अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. 

याच वेळी आगामी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक देखील आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रित ताकदीनिशी लढवणार असल्याची घोषणा करत, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तथा "विठ्ठल'चे संचालक युवराज पाटील यांनी विठ्ठलच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. आगामी विधानसभा आणि विठ्ठल साखर कारखाना या दोन्ही निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून, तालुक्‍याच्या राजकारणातील या नव्या उलथापालथीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विठ्ठल हॉस्पिटल येथे बैठक झाली. तीमध्ये पक्षातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत, अप्रत्यक्ष भगीरथ भालकेंसह त्यांच्या समर्थकांवर टीकास्त्र सोडले. 

बैठकीला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. गणेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष ऍड. दीपक पवार, शहर अध्यक्ष सुधीर भोसले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव अरुण आसबे, श्रीकांत शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा युवती अध्यक्षा श्रेया भोसले, ओबीसी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा साधना राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

बैठकीनंतर बोलताना विठ्ठलचे संचालक युवराज पाटील म्हणाले, तालुका अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये राजकारण झाले आहे. प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करताना कोणालाही विश्वासात घेतले नाही. ही निवड बेकायदेशीर व चुकीची आहे. ती रद्द करावी, अशी मागणी पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले यांच्याकडे केली आहे. 

(कै.) औदुंबरअण्णा पाटील, (कै.) राजूबापू पाटील, (कै,) वसंतराव काळे यांनी विठ्ठल कारखान्याचे हित पाहिले होते. परंतु अलीकडच्या काळात कारखान्याची अधोगती झाली. फायद्यात असलेला कारखाना आज सुमारे साडेपाचशे कोटी रुपये कर्जात आहे. कारखान्याची ही दयनीय अवस्था कोणी केली, याचा शोध घेण्याची गरज आहे. गेली दहा वर्षे मी संचालक मंडळात आहे. परंतु एकही गोष्ट आम्हा संचालकांना विश्वासात घेऊन केली नाही. ठराविक लोकच निर्णय घेत होते. या वर्षीच्या गाळप हंगामात देखील कारखान्याचे योग्य व्यवस्थापन करता न आल्यामुळे समारे 30 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांच्यावर केला. कारखान्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित करत, येत्या काळात विठ्ठलची निवडणूक ही प्रामाणिक लोकांना सोबत घेऊन लढवली जाणार आहे. कोणाच्याही दवाबाला बळी पडणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला मी तयार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

युवराज पाटील यांनी विठ्ठल कारखाना व विधानसभा निवडणुकीसंदर्भात जी भूमिका घेतली आहे, त्यांच्या या भूमिकेबरोबर आम्ही सर्व कार्यकर्ते सोबत राहणार आहोत. काही लोक पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांविषयी आम्ही वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचेही राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी सांगितले. 

मागील काही वर्षात राष्ट्रवादीचे चांगले काम करून देखील काही लोकांनी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आमच्या मागणीची वरिष्ठांनी दखल घेतल्याचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरून उमटलेले राजकीय पडसाद आगामी विधानसभा आणि विठ्ठल कारखाना या दोन्ही निवडणुकीत देखील उमटतील, अशीच शक्‍यता निर्माण झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल