तमिळनाडूत खून करून पळून जाण्याचा फसला प्लॅन ! ग्रामीण पोलिसांनी तिघांना पकडले; रिव्हॉल्व्हर, तीन जिवंत काडतुसे जप्त 

तात्या लांडगे 
Saturday, 14 November 2020

तमिळनाडू येथील एलिफंट गेट पोलिस ठाणे परिसरात पैशाच्या कारणावरून तिघांवर गोळीबार झाला. त्यानंतर संबंधित मारेकरी तिथून पसार झाले. ते सोलापूरच्या दिशेने येत असताना ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

सोलापूर : तमिळनाडू येथील एलिफंट गेट पोलिस ठाणे परिसरात पैशाच्या कारणावरून तिघांवर गोळीबार झाला. त्यानंतर संबंधित मारेकरी तिथून पसार झाले. ते सोलापूरच्या दिशेने येत असताना ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

हे गुन्हेगार सोलापूरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी लावली. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक पथक हैदराबाद रोडकडे रवाना केले. त्या पथकाला लाल रंगाची चारचाकी संशयितरीत्या येताना दिसली. त्यांनी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. मात्र, त्या वाहनातील व्यक्तींना पोलिसांचा संशय आला आणि त्यांनी वाहन भरधाव वेगाने चालवत मुळेगाव तांडा गाठला. त्या ठिकाणी आल्यावर त्यांनी आपली गाडी पुन्हा हैदराबाद रोडकडे वळवले. ग्रामीण पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला आणि त्यांना पकडले. 

त्या तिघांना अटक केली, त्यानंतर एन-2 काशिमेडू पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पी. जवाहर यांना त्यांचा ताबा देण्यात आला. त्यांच्याकडून एक रिव्हॉल्व्हर व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक अरुण सावंत, पोलिस निरीक्षक सुहास जगताप, पोलिस नाईक प्रकाश क्षीरसागर, अनिस शेख, राहुल कोरे, शशी कोळेकर, बसवराज अष्टगी, मोहन मोटे, परशुराम शिंदे, लालसिंग राठोड, रामनाथ बोंबीलवार व अन्वर अत्तार यांच्या पथकाने केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rural police arrested the criminals who were trying to escape by murder