कपडे खरेदीसाठी गर्दी ; बाजारपेठेत कोरोनाची धास्ती झाली कमी 

प्रकाश सनपूरकर
Thursday, 22 October 2020

चाटी गल्लीतील व्यापारी पुरुषोत्तम धुत यांनी सांगितले की, बाजारात दसरा व दिवाळीची खरेदी सुरू झाली आहे. ग्राहक आता कोरोनाच्या धास्तीतून मुक्त होत खरेदीसाठी येऊ लागले आहेत. 

सोलापूर ः दसरा व दिवाळीचा सण जवळ आल्याने शहरात कपडे खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी होत आहे. लॉकडाउन व इतर कारणांमुळे मागील वर्षभरापासून विस्कळित असलेले कापड मार्केट आता ग्राहकांच्या गर्दीने फुलू लागले आहे. साडी विथ मॅचिंग मास्क, खण साडी व सील्क साड्याचे वर्कमधील प्रकार महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

लॉकडाउननंतर बाजारपेठ उघडल्यापासून खरेदीसाठी महिला बाजारात दाखल होऊ लागल्या आहेत. दसऱ्याचा सण अगदी चार दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यानंतर पंधरवडाभरात दिवाळी असे सण येत आहेत. बाजारपेठेत आता कोरोनाची धास्ती बऱ्यापैकी कमी झाली आहे. अधिकमासात चांदीच्या वस्तूंच्या खरेदीला मोठा प्रतिसाद होता. त्यानंतर आता कपडे खरेदीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. शहरातील चाटी गल्ली, बेगम पेठ आदी भागातील बाजारात दिवसभर मोठ्या प्रमाणात कपडे खरेदी केली जात आहे. यावर्षी लॉकडाउनमुळे उशीराने नवीन मालाची आवक सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांनी नवा माल नवरात्र उत्सवाआधीच भरला आहे. ड्रेस मटेरिअलमध्ये अनेक प्रकारची वर्कची कामे असलेले ड्रेस मटेरिअल विक्रीसाठी आलेले आहेत. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सेल देखील लागले आहेत. ड्रेस मटेरिअलमध्ये अधिकाधीक वर्कचे मटेरिअल विक्री होऊ लागले आहे. नवीन मालाचे उत्पादन सुरू झाले असले तरी हा माल कमी प्रमाणात बाजारात पोहोचत आहे. 

साडी बाजारपेठेमध्ये साड्यांचे नवनवीन प्रकार विक्रीसाठी आले आहेत. यामध्ये मॅचिंग मास्क साडीला ग्राहकांची मोठी मागणी आहे. इरकल, कांजीवरम, पैठणी आदी प्रकारात देखील साड्यांची खरेदी केली जात आहे. यावेळी खण साडी हा प्रकार बाजाराचे आकर्षण बनला आहे. पूर्वी खणाचे प्रकार असत. त्यामध्ये आता त्याच प्रकारच्या साड्या तयार झाल्या असून त्यास खण साडी हे नाव त्यामुळे पडले आहे. यावर्षी खण साडी विशेषत्वाने मिळते आहे. 

सिल्क साड्यामध्ये पूर्वी वर्कचे काम अगदीच कमी असायचे. या वर्षी सिल्कच्या वर्क असलेल्या साड्या बाजारात आल्या आहेत. या शिवाय सिल्कचे प्रकार बेंगलुरू, धर्मावरम, बनारस, चापा, इंदोर आदी अनेक प्रकार उपलब्ध झाले आहेत. कशिदाकाम असलेले प्रकार देखील उपलब्ध झाले आहेत. या शिवाय रेडीमेड ड्रेसमध्ये वर्क फेज साडी, कटवर्क, हेल्ड वर्क, दुल्हन लाचे, शरारा व प्लाझो सारखे ड्रेस मटेरीअलची खरेदी होत आहे. 

चाटी गल्लीतील व्यापारी पुरुषोत्तम धुत यांनी सांगितले की, बाजारात दसरा व दिवाळीची खरेदी सुरू झाली आहे. ग्राहक आता कोरोनाच्या धास्तीतून मुक्त होत खरेदीसाठी येऊ लागले आहेत. 

व्यापारी सोमेश रेळेकर यांनी सांगितले की, दसरा व दिवाळी व लग्न सराईमुळे खरेदीसाठी ग्राहकाची संख्या वाढते आहे. बाजारासाठी ही बाब सकारात्मक आहे. 

विक्रेते असगरअली खत्री 
लॉकडाउननंतर ग्राहकाची वर्दळ सुरू झाली आहे. तसेच पुरेशा प्रमाणात नव्या फॅशनचा माल देखील बाजारात उपलब्ध झाला आहे. 

संपादन : अरविंद मोटे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rush to buy clothes; Corona fears less in the market