पांडुरंग साखर कारखान्याच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह ! ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर कोसळली क्रेन 

मनोज गायकवाड 
Monday, 26 October 2020

ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर येथील श्री पांडुरंग कारखान्याची ऊस लिफ्टिंग क्रेन कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही; मात्र हंगामाच्या प्रारंभालाच क्रेन कोसळल्याने कारखान्यातील कामाच्या गुणवत्तेवर व सुरक्षिततेवर आता प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

श्रीपूर (सोलापूर) : ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर येथील श्री पांडुरंग कारखान्याची ऊस लिफ्टिंग क्रेन कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही; मात्र हंगामाच्या प्रारंभालाच क्रेन कोसळल्याने कारखान्यातील कामाच्या गुणवत्तेवर व सुरक्षिततेवर आता प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. 

गेल्या बुधवारी (ता. 14) कारखान्याच्या हंगाम प्रारंभाचे नियोजन होते. मात्र, त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. या परिस्थितीत (कै.) सुधाकरपंत परिचारक यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते मोळीपूजन समारंभ पार पडला होता. त्यानंतर, शुक्रवारी (ता. 23) पुन्हा कार्यकारी संचालकांनी स्वहस्ते मोळीपूजन केले आणि प्रत्यक्ष गाळपाला सुरवात केली. शनिवारी (ता. 24) उत्पादित झालेल्या साखर पोत्यांच्या पूजनाचा कार्यक्रम केला आणि रविवारी (ता. 25) पहाटे क्रेन तुटून खाली पडली. त्यामुळे "पांडुरंग'च्या अधिकाऱ्यांची कामाची पद्धत आणि गुणवत्ता चर्चेत आली आहे. गेल्या चार-पाच वर्षात अधिकारी व ठेकेदारांमध्ये मोठे "अर्थ'पूर्ण हितसंबंध निर्माण झाले आहेत, त्यामुळे कोणत्याही कामाला गुणवत्ता राहिली नसल्याची चर्चा कारखाना कार्यस्थळावर सुरू आहे. 

रविवारी पहाटे साधारणतः दोन वाजून दहा मिनिटांनी कारखान्याच्या तीन क्रेनपैकी मधली क्रेन तुटून खाली पडली. ट्रॉलीमधील उसाचे वजनच क्रेनला पेलले नाही, त्यामुळे साधारणतः सात टन वजन असलेली ही क्रेन वरून तुटून टेबल आणि ट्रॉलीवर आपटली. या वेळी उसाच्या दोऱ्या क्रेनला अडकविणारे व ऊस मोळ्याचे वाडे काढणारे मजूर आणि वाहनचालक बाजूला गेले होते. त्यामुळे, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र, मोठ्या आवाजासह क्रेन कोसळल्याने तेथे मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. 

आमदार परिचारकांनी अधिक लक्ष देण्याची गरज 
कारखान्यातील सर्व यांत्रिक कामे झाली आहेत. आम्ही गाळपासाठी सज्ज आहोत, असे अधिकारी छातीठोकपणे सांगत होते. मग हे कसे काय घडले? गेल्या चार-पाच वर्षात कोणत्याही कामांना गुणवत्ताच राहिली नाही. त्यामुळे आता आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक यांनी कारखान्यात अधिक लक्ष दिले पाहिजे, अशा संतप्त भावना या वेळी अपघातस्थळी उमटल्या होत्या. दरम्यान, जादा उसाच्या बोजामुळे क्रेन तुटल्याचे अधिकारी सांगत आहेत; मात्र याबाबत अधिकृतपणे कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

जबाबदारी अधिकाऱ्यांची ! 
सुधाकरपंत परिचारक यांचे नुकतेच निधन झाले आहे. या धक्‍क्‍यातून परिचारक परिवार अजून सावरलेला नाही. या परिस्थितीत कारखान्यातील बहुतांश निर्णय अधिकारी स्तरावर घेतले जात आहेत. त्यामुळे या अपघाताची जबाबदारी अधिकाऱ्यांची असल्याची शेतकरी व कामगारांची भावना आहे. केवळ रंगरंगोटी, कॉंक्रिटीकरण अशा कामात पारंगत असलेल्या मंडळींवर मोठ्या जबाबदारी दिल्या आहेत. त्याचाच हा परिणाम असल्याची चर्चा काही संचालक देखील दबक्‍या आवाजात करीत आहेत. 

अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी 
बुधवारी (ता. 14) सुधाकरपंतांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या हस्ते विधिवत मोळीपूजन समारंभ पार पडला होता. त्यानंतर शुक्रवारी (ता. 23) पुन्हा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकारी संचालकांनी स्वहस्ते मोळीपूजन करून आज प्रत्यक्ष हंगाम सुरू झाल्याचे जाहीर केले. ही बाब अनेक संचालक, सभासद व कामगारांना खटकली होती. त्यामुळे आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत सुधाकरपंतांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करून गेल्या बुधवारी झालेले मोळीपूजन ही केवळ औपचारिकता होती काय? अशा संतप्त प्रतिक्रिया सभासदांमधून उमटल्या आहेत. त्यातच ऐन विजयादशमीच्या दिवशी क्रेन तुटली आहे, त्यामुळे कामाची गुणवत्ता व अधिकाऱ्यांची कार्यपद्धती हे विषय चांगलेच ऐरणीवर आले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Safety of Pandurang Sugar Factory has been questioned due to crane falling