कुर्डुवाडी ते भिगवण रेल्वे विद्युतीकरण कामाची सुरक्षितता तपासणी चाचणी यशस्वी !

विजयकुमार कन्हेरे
Friday, 13 November 2020

जानेवारी 2019 ला विद्युतीकरणाचे काम सुरू झाले होते. या तपासणी दरम्यान कुर्डुवाडी येथील एफओबी उंची, पॉवर, आर्थिंग, भीमा नदीच्या पुलावरील वेग यासह विद्युतीकरणाच्या सर्व गोष्टी तपासण्यात आल्या. कुर्डुवाडी ते भिगवण यादरम्यान जेऊर वगळता सर्व रेल्वे स्थानकांवर विद्युतीकरण सबस्टेशन आहेत. ढवळस, भाळवणी, पोफळज 21 नंबर गेट, पारेवाडी रेल्वे स्थानकावर पथकाने पाहणी केली. सुमारे 80 रूट किमी व 130 ट्रॅक किमी विद्युतीकरणाच्या कामाची तपासणी करण्यात आली. 

कुर्डुवाडी (सोलापूर) : कुर्डुवाडी ते भिगवण यादरम्यान झालेल्या 80 रूट किलोमीटर रेल्वे विद्युतीकरणाची सुरक्षितता तपासणी रेल्वे अधिकाऱ्यांच्या पथकाने केली असून, त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 

भिगवण ते सोलापूर यादरम्यान होणाऱ्या विद्युतीकरणापैकी भिगवण ते कुर्डुवाडीच्या भागाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी ए. के. जैन व पथकाच्या तपासणीवेळी पीसीईई ए. के. तिवारी, डेप्युटी कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी जी. जी. गर्ग, डीआरएम जे. के. गुप्ता, रेल्वे विकास निगम लिमिटेडचे पी. एम. शर्मा, ए. एम. शर्मा, प्रोजेक्‍ट इंजिनिअर नंदकिशोर, मॅनेजर आरूप लॉयचौधरी, विजय बोधले, कुर्डुवाडी रेल्वे स्थानक प्रबंधक आर. डी. चौधरी, आर. एस. भानवसे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

जानेवारी 2019 ला हे काम सुरू झाले होते. या तपासणी दरम्यान कुर्डुवाडी येथील एफओबी उंची, पॉवर, आर्थिंग, भीमा नदीच्या पुलावरील वेग यासह विद्युतीकरणाच्या सर्व गोष्टी तपासण्यात आल्या. कुर्डुवाडी ते भिगवण यादरम्यान जेऊर वगळता सर्व रेल्वे स्थानकांवर विद्युतीकरण सबस्टेशन आहेत. ढवळस, भाळवणी, पोफळज 21 नंबर गेट, पारेवाडी रेल्वे स्थानकावर पथकाने पाहणी केली. सुमारे 80 रूट किमी व 130 ट्रॅक किमी विद्युतीकरणाच्या कामाची तपासणी करण्यात आली. 

गाडी तासी कमाल 114 किलोमीटर या वेगाने धावली. विद्युतीकरणामुळे डिझेल ऐवजी वीज वापरण्यात येणार असल्याने इंधनाची बचत व खर्चही कमी होणार आहे. 

पुणे-सोलापूर रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम कोरोना लॉकडाउनच्या काळातही परप्रांतीय मजुरांमार्फत युद्धपातळीवर सुरू होते. त्याअंतर्गत 26 जुलै 2020 रोजी भिगवण येथील वीज केंद्रावरून भिगवण ते वाशिंबे ही विद्युत चाचणी घेण्यात आली होती. ही घेण्यात आलेली चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती. दरम्यान, राहिलेले विद्युतीकरण व पारेवाडी येथील वीज केंद्राचे काम पूर्ण झाल्याने गुरुवारी (ता. 12) कुर्डुवाडी (सोलापूर) ते भिगवण (पुणे) यादरम्यान संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्युतीकरण चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. 

या रेल्वे मार्गावर यापुढे डिझेल इंजिनऐवजी विजेवर चालणारे इंजिन थेट मुंबईपर्यंत धावणार असल्याने पुणे, मुंबईला जाण्यासाठी यामुळे कमी वेळ लागणार असल्याने वेळेचीही बचत होणार आहे. दरम्यान रेल्वेच्या दुहेरीकरणाचे कामही वेगाने सुरू आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Safety test of Kurduwadi to Bhigwan railway electrification work successful