अक्कलकोट सखी ग्रुपची बबलाद पूरग्रस्तांना दिवाळीची अनोखी भेट !

राजशेखर चौधरी 
Friday, 13 November 2020

अक्कलकोट येथील सखी ग्रुपच्या वतीने दरवर्षी दिवाळीनिमित्त आगळावेगळा समाजोपयोगी कार्यक्रम राबविला जातो. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या दिवाळी सणानिमित्तही अक्कलकोट तालुक्‍यातील बबलाद गावच्या 100 पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळी भेट देण्यात आली. 

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथील सखी ग्रुपच्या वतीने दरवर्षी दिवाळीनिमित्त आगळावेगळा समाजोपयोगी कार्यक्रम राबविला जातो. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या दिवाळी सणानिमित्तही अक्कलकोट तालुक्‍यातील बबलाद गावच्या 100 पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळी भेट देण्यात आली. 

अक्कलकोट तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बोरी नदीकाठची अनेक गावे पूरग्रस्त झालेली आहेत. पूरग्रस्त बबलाद गावामध्ये जवळपास शंभर कुटुंबांच्या घरांत पुराचे पाणी शिरले होते व या गरीब नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या महापुरानंतर पूरग्रस्त नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, ही भीषण परिस्थिती लक्षात घेऊन सखी ग्रुपच्या सर्व महिला सदस्यांनी या वर्षीची दिवाळी बबलाद गावच्या पूरग्रस्त नागरिकांसोबत साजरी करण्याचे ठरविले व तसे नियोजन करण्यात आले. 

याप्रसंगी या पूरग्रस्त नागरिकांना चिवडा, लाडू, दिवाळी फराळ बनविण्यासाठीचे साहित्य साखर, बेसन पीठ, रवा, गोडेतेल, उटणे, दिवे - पणत्या, साबण, सुगंधी तेल, मास्क, सॅनिटायझर आदींचा समावेश असलेले किट्‌स वितरण करण्यात आले. या वेळी ग्रुपच्या सदस्यांनी परिसरात स्वच्छता करून नागरिकांना कोव्हिड 19 च्या काळात राखावयाच्या स्वच्छतेबाबत व घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन व संबोधितही केले. 

सखी ग्रुपच्या सर्व समाजोपयोगी उपक्रमांमुळे बबलाद येथील पूरग्रस्त गरीब नागरिकांना या दुःखातून बाहेर पडण्यास मदत होऊन दिवाळी आनंदात साजरी होणार आहे, असे उद्‌गार याप्रसंगी येथील ग्रामस्थांनी काढले. या वेळी राजशेखर लकाबशेट्टी, शरणप्पा फुलारी, अण्णप्प कुंभार, सैपन जमादार, आमसिद्ध पुजारी, आनंद देगाव, सुशीला कलशेट्टी, संगीता सालेगाव, चन्नम्मा सुतार व सखी ग्रुपच्या सदस्या उपस्थित होत्या. 

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सखी ग्रुपच्या मल्लम्मा पसारे, सुवर्णा साखरे, सोनल जाजू, रत्नमाला मचाले, अनिता पाटील, उषा छत्रे, लक्ष्मी आचलेर, श्रद्धा मंगरुळे, मीलन तोरस्कर, शीतल जिरोळे, अश्विनी बोराळकर, रोहिणी फुलारी, आशा भगरे, वेदिका हार्डिकर, प्रियंका किरनळ्ळी, माधवी धर्मसाले, डॉ. दीपमाला अडवितोट, वर्षा शिंदे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakhi group from Akkalkot gives Diwali gift to Bablad flood victims