सोलापुरातील मद्य विक्रीच्या  महसुलात 17 कोटींची घट 

प्रमोद बोडके
Monday, 8 June 2020

सरकारने जाहीर केल्यानंतर लॉकडाउन कालावधीत बनावट, अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत जवळपास 450 गुन्हे दाखल झाले आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या महसुलात झालेली घट भरून काढण्यासाठी किरकोळ मद्य विक्री सुरू करणे आवश्‍यक आहे. 
- रवींद्र आवळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर 

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन, संचारबंदी कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्कच्या महसुलात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 17 कोटी 82 लाख रुपयांची घट झाल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारला मद्य विक्रीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सोलापूर शहर व जिल्ह्यात बंद केलेली मद्य विक्री अद्याप बंदच असल्याने शासनाचा मोठा महसूल या वर्षी घटला आहे. 

सोलापूर शहर व जिल्ह्यात देशी दारू विक्रीची अंदाजे 117 दुकाने आहेत. 42 वाइन शॉप आहेत. 350 परमिट रूम तर 250च्या आसपास बिअर शॉप आहेत. राज्याच्या तिजोरीत गौण खनिज, मुद्रांक शुल्क आणि राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम दिली जाते. राज्य सरकारची तिजोरी भरणारे हे तीन महत्त्वाचे आर्थिक झरेच लॉकडाउन कालावधीत बंद असल्याने राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. 2019 मध्ये 22 ते 31 मार्च कालवधीत 14 कोटी 69 लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. या वर्षी याच कालावधीत फक्त एक कोटी 94 लाखांचा महसूल मिळाला आहे. 

एप्रिल 2019 मध्ये सात कोटी चार लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. या वर्षी पाच कोटी 18 लाखांचा महसूल मिळाला आहे. मे 2019 मध्ये आठ कोटी 31 लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. या वर्षी मे महिन्यात पाच कोटी 47 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. 1 ते 7 जून 2019 कालावधीत एक कोटी 49 लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. या वर्षी एक कोटी 12 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. या वर्षी लॉकडाउन कालावधीत शासनाला मिळालेला महसूल हा परवाना नुतनीकरणापोटी व अन्य बाबीतून मिळालेला आहे. 22 मार्च ते 7 जून कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा महसुलसात 56.51 टक्‍यांची घट झाली आहे. 

मद्य विक्रीला बंदी, छुप्या दलालांची मात्र चांदी 
लॉकडाउन कालावधीत जिल्ह्यात ठिकठिकाणी दुप्पट, वेळप्रसंगी तिप्पट दराने मद्य विक्री झाल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे शासनाला मिळालेला महसूल बुडाल; मात्र काही जणांची या काळात चांगलीच चांदी झाली आहे. चोरट्या मार्गाने मद्य विक्री करणारे या कालावधीत किती मालामाल झाले? याच्या चर्चा आता उघडपणे होऊ लागल्या आहेत. लॉकडाउन शिथिल होत असताना राज्यातील अन्य जिल्ह्यात किरकोळ मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. सोलापूर शेजारी असलेल्या जिल्ह्यातही परवानगी देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात मद्य विक्रीला परवानगी द्यावी, अशी मागणी तळिरामांकडून व विक्रेत्यांकडून होत आहे. आजपासून लॉकडाउनमधून बऱ्यापैकी सवलती मिळाल्याने मद्य विक्रीबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा तळिरामांना लागली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sale of liquor in Solapur 17 crore reduction in revenue