संभाजी तलाव सुशोभिकरण : चार्जेस घ्या, पण स्वच्छता ठेवा, सुविधा द्या! 

प्रमोद बोडके
Sunday, 20 September 2020

या तलावाच्या सुशोभिकरणाचा व संवर्धनासाठी महापालिकेच्यावतीने 2012 पासून प्रयत्न करण्यात येत होते. या प्रयत्नांना मूर्त स्वरुप मिळाले असून केंद्र सरकारच्या माध्यमातून व महापालिकेच्या माध्यमातून या कामासाठी निधी उपलब्ध झाला. कामाच्या निविदा निश्‍चित होऊन कामाचा शुभारंभही झाला आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
- संजय धनशेट्टी, सार्वजनिक आरोग्य अभियंता 

सोलापूर : धर्मवीर संभाजी तलावाच्या संवर्धनाच्या व सुशोभिकरणाच्या कामाचा प्रारंभ झाला आहे. महापालिका व सरकारने दिलेल्या निधीमुळे तलावाचे सुशोभिकरण व संवर्धनही होईल. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर येथील सुविधांचा लाभ घेण्यासाठी माफक दराची आकारणी करावी, परंतु येथील स्वच्छता, सुरक्षा आणि सुशोभिकरण कायमस्वरुपी अबाधित ठेवावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

सकाळने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून तलावाच्या सुशोभिकरणाच्या व संवर्धनाच्या कामाचा प्रारंभ झाला आहे. वर्षानुवर्षे तुंबलेला तलाव व जलपर्णीच्या विळखण्यात अडकलेला तलाव येत्या काही दिवसात मोकळा श्‍वास घेणार आहे. तलावाचे सुशोभिकरण झाल्यानंतर येथील सुविधा, स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांचा दबाव गट असावा, अशी अपेक्षा या परिसरातील नागरिकांनी "सकाळ'कडे व्यक्त केली. येथील सुविधांसाठी आकारण्यात येणाऱ्या चार्जेसमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून तलाव परिसराच्या देखभाल दुरुस्तीची कामे करता येतील. त्यातून तलावाचे सौंदर्य अबाधित ठेवता येईल, अशीही अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

पर्यटक या ठिकाणी यावेत 
सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसाठी हा चांगला पिकनिक स्पॉट तयार होत आहे. सोलापूर जिल्ह्यात येणारे पर्यटक या ठिकाणी यावेत, पर्यटक व भाविकांच्या माध्यमातून येथील स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी स्वतंत्र योजना आवश्‍यक असल्याचे मत डॉ. शिवप्पा मल्लाडे यांनी व्यक्त केले. 

दबाव गट आवश्‍यक 
तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील स्वच्छता, सौंदर्य आबाधित ठेवण्यासाठी नागरिकांचा दबाव गट आवश्‍यक आहे. त्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घ्यावा. तलाव परिसरातील सुविधांसाठी माफक चार्जेस घ्यावेत, त्यातून मिळणाऱ्या पैशांतून भविष्यातील येथील दुरुस्तीची कामे करता येतील अशी माहिती डॉ. सुनीलकुमार पाटील यांनी दिली. 

पुन्हा घाण पाणी येणार नाही याची दक्षता घ्यावी 
सध्या तलावात असलेल्या घाण पाण्यामुळे या परिसरात डासांचा त्रास होत आहे. सध्या होत असलेल्या सुशोभिकरणाच्या कामामुळे हा त्रास कायमस्वरुपी संपणार आहे. तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा घाण पाणी येणार नाही याची दक्षता घ्यावी अशी अपेक्षा अशोक गुळगी यांनी व्यक्त केली. 

एनटीआर तलावाच्या धर्तीवर संभाजी तलावाचे सुशोभिकरण 
हैदराबादमधील एनटीआर तलावाच्या धर्तीवर संभाजी तलावाचे सुशोभिकरण होणे आवश्‍यक आहे. "सकाळ'च्या पुढाकारातून या कामांना शुभारंभ झाला आहे. होणाऱ्या कामांचा दर्जा कायमस्वरुपी टिकविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याची अपेक्षा प्रतीक्षा गुळगी यांनी व्यक्त केली. 

बोटिंगची सुविधा 
तलावात बोटिंगची सुविधा उपलब्ध झाल्यास त्यातून महापालिकेला उत्पन्नाचा मार्ग मिळेल. बोटिंगमुळे तलावातील पाणी कायमस्वरुपी स्वच्छ राहण्यास मदत होईल. तलावाचे सौंदर्य कायमस्वरुपी टिकविण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा अर्चना पाटील यांनी व्यक्त केली. 

प्रभावी उपाययोजना कराव्यात 
घाण पाण्यातील फॉस्परसमुळे तलावात जलपर्णी वाढते, तलाव स्वच्छ ठेवणाऱ्या जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्‍यात येते. तलावात घाण पाणी येऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. एरिएशन फाऊंटनच्या माध्यमातून तलावातील पाणी कायमस्वरुपी स्वच्छ ठेवता येईल असे मत डॉ. जी. के. देशमुख यांनी व्यक्त केले. 

वॉकिंग ट्रॅकची गरज 
तलाव परिसरात वॉकिंग ट्रॅक केल्यास त्याचा उपयोग परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला यांना होणार आहे. नव्याने वाढत असलेल्या जुळे सोलापूर, सैफुल परिसरातील नागरिकांसाठी धर्मवीर संभाजी तलाव हे करमणुकीचे चांगले ठिकाण तयार होत असल्याची माहिती डॉ. रश्‍मी वरशेट्टी-पाटील यांनी दिली. 

तलावाचे मार्केटिंग व्हावे 
पंढरपूर, अक्‍कलकोट, तुळजापूर या ठिकाणी जाणारे भाविक सोलापुरातूनच जातात. तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर या भाविकांना धर्मवीर संभाजी तलावाबद्दल माहिती द्यावी. त्यातून सोलापुरातील रोजगाराला मोठी मदत होईल. बोटिंगच्या माध्यमातूनही उत्पन्न आणि तलावातील पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा अमोल चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Lake beautification: Take charges, but keep it clean, provide facilities!