सोलापूर जिल्ह्यातील 388 कोंबड्यांचे घेतले नमुने, बर्ड फ्लूच्या पार्श्‍वभूमीर खबरदारी : कावळ्यांसह अन्य पक्षांवर वन विभागाचे लक्ष 

प्रमोद बोडके
Tuesday, 12 January 2021

बर्ड फ्लू पक्षांपासून माणसांना होऊ शकतो परंतु अशा घटना फार कमी घडल्या आहेत. बर्ड फ्लूमुळे माणसाचा मृत्यू होण्याच्याही घटना कमी आहेत. विषाणूजन्य आजारामध्ये ताप, थंडीसह इतर जशी लक्षणे असतात, तशीच लक्षणे माणसांमधील बर्ड फ्लू आजाराची आहेत. जास्त त्रास वाढल्यास त्याचे रुपांतर न्यूमोनियामध्ये होउन माणसाचा मृत्यूही होउ शकतो. अंडी व चिकन चांगले शिजवून खालल्यास बर्ड फ्लू होण्याचा धोका नाही. अंडी शिजवूनच खावीत. 
-डॉ. एच. बी. प्रसाद, औषधवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख, डॉ. वैशंपायन स्मृती शासकिय वैद्यकीय महाविद्यालय 

सोलापूर : कोरोनाला संकट देत असतानाच आता महाराष्ट्रावर बर्ड फ्लूचे नवीन संकट आले आहे. परभणीत कोंबड्यांचा झालेला मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच असल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीर राज्यातील पशुसंवर्धन यंत्रणा सतर्क झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 388 कोंबड्यांच्या रक्ताचे, विष्ठेचे आणि कोंबड्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. तपासणीसाठी हे नमुने औंध (पुणे) येथील प्रयोशाळेला पाठविण्यात आले आहेत. 

पंढरपूर तालुक्‍यातील दोन, उत्तर सोलापूर, माळशिरस, सांगोला, मोहोळ आणि माढा तालुक्‍यातील प्रत्येकी एक अशा एकूण सात गावांमधील 388 कोंबड्यांचे नमुने घेतले आहेत. त्यामध्ये 108 नमुने रक्ताचे, 138 नमुने विष्ठेचे आणि 142 नमुने कोंबड्यांच्या घशातील आहेत. बर्ड फ्लूचा सामना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रत्येक तालुक्‍यासाठी एक पथक नियुक्त केले आहे. एका पथकात सहा तज्ज्ञ पशुवैद्यकांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोंबड्यांचा कुठे मृत्यू झाल्यास त्याची माहिती प्रशासनाला कळविण्यासाठी हेल्पलाईन विकसित करण्यात येत आहे. नेहरुनगर येथील कुक्कटपालन केंद्रात बर्ड फ्लू नियंत्रण कक्षही सुरु झाला आहे. 

जिल्ह्यात उजनी, हिप्परगा, होटगी, कुरनूर या धरण, तलाव व प्रकल्पासोबतच महत्वाच्या पाणवठ्यांवर परदेशी पक्षी येऊ लागले आहेत. या शिवाय चिमणी, कावळा, कबुतर, पारवा यासह इतर स्थानिक पक्षांच्या माध्यमातून बर्ड फ्लूची लागण सोलापूर जिल्ह्यात होऊ नये, यासाठी वन विभाग सज्ज झाला आहे. याबाबतची माहिती वन विभागाच्या वतीने पशुसंवर्धन विभागाला दिली जाणार असल्याचे उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी सांगितले. 

जिल्ह्यात 35 लाख कोंबड्या 
सोलापूर जिल्ह्यात सध्या चिकनच्या 8 लाख ब्रॉयलर कोंबड्या, अंडी देणाऱ्या लेअरच्या 14 लाख कोंबड्या, तर 13 देशी व संकरित कोंबड्या सध्या सोलापूर जिल्ह्यात आहेत. बॉयलर व लेअरच्या कुक्कटपालनासाठी सोलापूर जिल्ह्यात बार्शी, सांगोला आणि माळशिरस तालुके हे आघाडीवर आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने या तिन्ही तालुक्‍यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 

मोठ्या प्रमाणात मर्तुक हेच प्रमुख लक्षण 
एकाचवेळी मोठ्या प्रमाणात कोंबड्या मरणे हेच बर्ड फ्लूचे सर्वात प्रमुख लक्षण असल्याची माहिती पशुवैद्यक डॉ. एस. एस. बोरकर यांनी दिली. कोंबड्यांमधील इतर आजार लसीकरणाच्या माध्यमातून नियंत्रित केले जातात. बर्ड फ्लूसाठी कोणतेही लसीकरण नसल्याने अचानकपणे एकाचवेळी कोंबड्यांची मोठ्या मुर्तक होत असल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samples taken from 388 chickens in Solapur district, bird flu background warning: Forest department pays attention to crows and other birds

टॉपिकस