
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये सध्या विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी व उमेदवारांनी मतदारांच्या तसेच तालुक्यातील पक्षप्रमुखांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे.
सांगोला (सोलापूर) : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये सध्या विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी, उमेदवारांनी मतदारांच्या तसेच तालुक्यातील पक्षप्रमुखांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. परंतु या निवडणुकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या मेळाव्या व बैठकांमध्ये उच्चशिक्षित, सुशिक्षित लोकच नियम पाळत नसल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.
पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडून तसेच अपक्षांकडून सध्या तालुक्यातील विविध पक्षांच्या प्रमुख नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. या गाठीभेटी बरोबरच पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदारांसाठी तालुक्याच्या ठिकाणी बैठका, मेळावे आयोजित केले जात आहेत. निवडणुकीचे वातावरण तापू लागले असले तरी या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार, पक्षाची प्रमुख नेतेमंडळी तालुक्यात आले की तालुक्यातील शेकापसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेच्या प्रमुख नेतेमंडळींच्या घरी किंवा कार्यालयात जाऊन गाठीभेटी घेण्यावर भर देत आहेत.
शेतकरी कामगार पक्षाने या निवडणुकीत शिवसेना, कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असला, तरी इतर विरोधी पक्षांची प्रमुख नेतेमंडळी किंवा अपक्ष उमेदवारही माजी आमदार देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांची निवडणुकीसंदर्भात भेट घेताना दिसत आहेत. शेकापसह तालुक्यातील इतर नेत्यांच्याही कार्यालयांत, घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली जात असल्याचेही दिसून येत आहे. प्रमुख पक्षांच्या दोन्ही बाजूंकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने मतदारांपर्यंत पोचण्यासाठी तालुका स्तरावर नानाविध प्रयत्न केले जात आहेत.
उच्चशिक्षित व सुशिक्षित मतदारांकडूनच नियम पायदळी
विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उच्चशिक्षित व सुशिक्षितच मतदार असतात. या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या विविध पक्षांच्या मतदारांबरोबर गाठीभेटी, मेळावे व बैठकांचे आयोजन उमेदवारांकडून किंवा पक्षांकडून केले जात आहे. परंतु असे मेळावे, बैठकांमधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियम मात्र पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा मेळाव्यांमधून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसून अनेकजण मास्कही लावत नसल्याचे चित्र मेळाव्याच्या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे उच्चशिक्षित व सुशिक्षित असे लोकच सध्या कोरोनाच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे सध्या दिसून येत आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल