सांगोला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सराईत गुन्हेगारांना पकडले 

Sangola police caught criminals in a film style
Sangola police caught criminals in a film style

सांगोला (सोलापूर) : अंगावर सोन्याचे दागिने असलेले सावज हेरून त्यांची लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पकडून सांगोला पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. उमदी येथे महिलेस लुटून पळून जाणाऱ्या कारचा पोलिसांनी सुमारे दोन तास फिल्मी स्टाइलने पाठलाग करून ग्रामस्थांच्या मदतीने तिघांपैकी महिलेसह एकास पकडले तर एकजण पळून गेला. यावेळी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार, फायबरचे दांडके, कपडे व उमदी येथील महिलेचे लुटलेले सुमारे 1 लाख 46 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. 

या गुन्हात ज्ञानेश्वर विठ्ठल घोरपडे (रा. उपळवटे, ता. माढा) व मिना दिलीप पाटील (रा. शिराळा ता. परांडा) या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना बुधवार (ता. 13)पर्यंत 5 दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. पकडलेले सराईत गुन्हेगार रेकॉडवरील असून त्यांनी सोलापूर, उस्मानाबाद, सांगली हद्दीत केलेले अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली. 

याबाबत सविस्तर माहिती अशी, तरंगेवाडी (ता. सांगोला) येथील वृद्ध महिलेस कडलास येथे सोडतो, असे सांगून पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून चार अज्ञात चोरट्यांनी तिला मारहाण करून एक लाख 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढून लूट केल्याची घटना ता. 16 डिसेंबर रोजी घडली होती. याच पद्धतीने जत पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन व मंद्रूप पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक असे सलगपणे घडत असल्याने गुन्ह्यातील आरोपी व पांढऱ्या रंगाच्या गाडीचा पोलिस शोध घेत होते. दरम्यान ता. 8 रोजी उमदी पोलिस स्टेशन हद्दीत एका महिलेस लूटमार करून कार सांगोलाच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेश गवळी व पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी तात्काळ पोलिसांची पथके जत रोड व मिरज रोडवर रवाना केली. मात्र सदरची कार नाकेबंदी चुकवून कडलासकडून सांगोलाच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेली. चालकाने कार न थांबविताच भरधाव वेगाने सांगोल्याच्या दिशेने गेल्याने पोलिसांनी त्या कारचा वाढेगाव, सावे, देवळे, बामणी, मांजरी, पवारवाडीपर्यत फिल्मी स्टाईलने पाठलाग केला. पोलिस अधिकारी, कर्मचारी कारचा पाठलाग करीत असताना सदर कार मांजरी (ता. सांगोला) गावातील अशोक शिनगारे व स्थानिक रहिवाशांच्या मदतीने पवारवाडीपर्यंत पाठलाग करून पकडली. मात्र कारमधील एक महिला व पुरुष मक्‍याच्या पिकात पळून गेल्याने पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने सुमारे 25 एकर शेताच्या परिसरात ज्वारी, मका, डाळिंब अशा पिकातून या दोघांचा सुमारे अडीच तास शोध घेऊन ताब्यात घेतले. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com