सांगोल्याचा शेकाप खदखदतोय, नव्या नेतृत्वाचा शोध घेतोय, कार्यकर्त्यांना अस्तित्वाची भीती : डॉ. देशमुख संपर्क क्षेत्राच्या बाहेर 

प्रमोद बोडके
Friday, 11 December 2020

कार्यकर्त्यांना आठवतोय भाऊसाहेब रूपनर यांचा अनुभव 
2019 ची विधानसभा निवडणूक आपण लढवणार नाही, हे माजी आमदार देशमुख यांनी जाहीर केले. शेकापचा उमेदवार म्हणून त्यांनी भाऊसाहेब रुपनर यांच्या नावाची घोषणाही केली. अवघ्या काही दिवसांमध्येच शेकापची उमेदवारी डॉ. अनिकेत देशमुख यांना मिळाली. सांगोल्यातील शेकापचे नेतृत्त्व भविष्यात कोण करणार? या प्रश्‍नावर कार्यकर्त्यांना रुपनर यांच्या या अनुभवाची प्रकर्षाने आठवण होत आहे. शेकापच्या नेतृत्त्वासाठी माजी आमदार गणपतराव देशमुख कोणाला संधी देतात? घरातील सदस्याला की जनाधार असलेल्या पक्षातील कार्यकर्त्याला, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर : राज्यातील शेतकरी कामगार पक्ष टप्प्याटप्प्याने संपला. परंतु सांगोल्यातील शेकाप मात्र तग धरून आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वाधिक 11 वेळा येण्याचा विक्रम माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी घडविला. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी त्यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना ऐनवेळी मैदानातही आणले. निवडणूक झाली आणि डॉ. अनिकेत देशमुख यांनी सांगोल्याचा संपर्क तोडला. शेकापचे नेतृत्त्व कोणाकडे? ही कार्यकर्त्यांमधील खदखद आता बाहेर येऊ लागली आहे. 

वयाच्या 94 व्या वर्षीदेखील सांगोल्यातील शेकापची धुरा अद्यापही माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या हातात. कार्यकर्त्यांशी संवाद आणि कार्यकर्त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आता काही मर्यादा येऊ लागल्या आहेत. त्याचा परिणाम सांगोल्यातील शेकापमध्ये काही प्रमाणात मरगळ आली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत असलेला युवा जोश आता निवडणुकीनंतर सांगोल्याच्या शेकापमध्ये दिसत नाही. डॉ. अनिकेत देशमुख वैद्यकीय शिक्षणासाठी पुण्याला गेले आहेत. त्यांच्याशी प्रत्यक्ष नाही, किमान दुरध्वनीवरुन-भ्रमणध्वनीवरुन तरी संवाद व्हावा, ही कार्यकर्त्यांची माफक अपेक्षा आहे. ही अपेक्षा प्रत्यक्षात मात्र फोल ठरताना दिसत आहे. 

सांगोला तालुका पंचायत समिती, खरेदी विक्री संघ, सूतगिरणी, सांगोला बाजार समिती या ठिकाणी शेकापची सत्ता आहे. जिल्हा परिषदेत तीन, जिल्हा दूध संघात दोन संचालक शेकापचे आहेत. संचालक मंडळ बरखास्त केलेल्या सोलापूर जिल्हा बॅंकेतही शेकापचे तीन संचालक होते. जनमताचा आणि सत्तेचा हा डोलारा भविष्यात कोण पेलणार? या प्रश्‍नाचे उत्तर सध्या तरी शेकापच्या कार्यकर्त्यांकडे दिसत नाही. 

असे झाले शेकापचे बालेकिल्ले उद्‌ध्वस्त 
कळमणुरीचे विठ्ठलराव नाईक, चौसाळ्याचे जनार्दन तुपे, तुळजापूरचे माणिक खपले, कंधारचे केशवराव धोंडगे, अलिबागचे जयंत पाटील, मीनाक्षी पाटील, पंडीत पाटील, पेनचे मोहनराव पाटील, धैर्यशिल पाटील, उरणचे विवेक पाटील, पनवेलचे दत्तूशेठ पाटील हे शेकापचे दिग्गज नेते. नेतृत्त्वाचा निर्णय योग्यवेळी न झाल्याने यातील कळमणुरी, चौसाळा, तुळजापूर, कंधार येथील शेकापचे अस्तित्त्व नामशेष झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात 1952 ते 1970 च्या काळात शेकापचे दोन खासदार आणि पाच आमदार असायचे. आता मात्र जिल्ह्यातील सांगोला वगळता इतर तालुक्‍यातील शेकाप नामशेष झाली आहे. सांगोल्यात शिल्लक राहिलेल्या शेकापच्या बाबतीत माजी आमदार गणपतराव देशमुख काय निर्णय घेतात? यावर बऱ्याच घडामोडी अवलंबून आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangola's peasantry is roaring, searching for new leadership, activists fear for existence: Dr. Outside Deshmukh contact area