शेतकरी ते उद्योजिका  सारिका पाटील यांचा प्रवास 

अरविंद मोटे 
Saturday, 17 October 2020

या उद्योगाबाबत सांगताना सारिका पाटील यांनी सांगितले की आमच्या उद्योगामुळे लोकांना विषमुक्त आरोग्यदायी आहारासाठी रासायनमुक्त तेल पुरवठा होतो. यामुळे आरोग्यात सुधारणा होते. रोगांपासून मुक्ति मिळते यामुळे या उद्योगात समाधानी आहोत. या उद्योगातून लोकांच्या आरोग्याची समस्या सोडवत असल्याचे समाधान मिळत असल्याचे सांगितले. 

आम्ही नवदुर्गा 

सोलापूर : मोहोळ तालुक्‍यात वाळुज नावाचं छोटसं गाव. या गावातील शेतकरी कुटुंबातील सारिका पाटील व अरविंद पाटील या दाम्पत्यांने शेतकरी ते उद्योजक असा धडाडीचा प्रवास केला आहे. सारिका पाटील यांच्या कष्ट व जिद्दीमुळे या दाम्पत्यांने लाकडी तेल घाण्याद्वारे नैसर्गिक व रसायनमुक्त खाद्यातेल निर्मितीच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू केली असून पाच लाखांच्या गुंणवणुकीत दर महा सव्वा लाखाची उलाढाल करणारा उद्योग सुरू केला आहे. 
मोहोळ शहरात कुरुल रोडवर राघव ऍग्रो ऑर्गेनिक फूड प्रोडक्‍टस्‌ या नावाने सारिका पाटील यांचे स्वत:चे फर्म सुरू आहे. 
मुळात शेतकरी पार्श्‍वभूमी असलेले सारिका व अरविंद पाटील या दाम्पत्याने दोन वर्षांपूर्वी नारायणपूर (ता. पुरंदर जि.पुणे ) येथील नारायणधाम निसर्गोपचार केंद्रात नोकरी केली. नारायणपूर येथे श्री. पाटील हे ट्रिटमेंट विभागाचे इन्चार्ज होते तर सारिका पाटील या फिजिओथेरपी विभागात काम करत असत. या निसर्गोपचार केंद्रात त्यांना नैसर्गिक आहाराचे महत्त्व पटले. तेथील प्रत्येक रुग्णाला लाकडी तेल घाण्याचे तेल खाणे आरोग्यास हितकारक असल्याचा सल्ला दिला जात असे, यातून पाटील दाम्पत्यांनी या उद्योगाकडे वळण्याचा मार्ग सापडला. 

नोकरी सोडून गावाकडे आले. उद्योगाला सुरवात करण्यासाठी भांडवल उभारणी जागा, प्रशिक्षण मशीन सर्व काही केले. तोच कोरोना महामारीचे संकट आले. लॉकडाउन सुरू झाले. तरीही न डगमगता सारिका पाटील यांनी लॉकडाउन उघडताच जिद्दीने उद्योगक्षेत्रातील प्रवास सुरूच ठेवला. पाच लाख रुपये गुंतवणूक करून लाकडी तेल घाण्यासाठी लागणारी मशीनरी खरेदी केल्या. मोहोळ शहरात राघव ऍग्रो ऑर्गेनिक फूड प्रोडक्‍टस्‌ या नावाने रसायनमुक्त तेल निर्मिती सुरू आहे. दर महा पाचशे लिटर तेल निर्मीती केली जाते. वाळुज (ता. मोहोळ ) येथे कच्चा माल तयार केला जातो. तर मोहोळा शहरात गाळप व विक्री केली जाते. या उद्योगासाठी सारिका पाटील यांनी जिल्हा उद्योग केंद्राकडून सहाय्य मिळावले आहे. 

वाळुज येथे पाटील कुटुंबियांची वडिलोपार्जित शेतजमिन आहे. सरिका पाटील व अरविंद पाटील यांनी आजवर या शेतीत अनेक प्रयोग केले. या परिसरात पाण्यासाठी निश्‍चित कोणाताही शाश्‍वत मार्ग नाही. पाऊस मोठ्या प्रमाणत झाला तर पुराने नुकसान कमी पडला तर पिण्याची पाण्याचीही समस्या अशी अवस्था आहे. अशा अवस्थेत शेत करत असताना दुधउत्पादन, कुकटपालन, मशरुम उत्पादन, याबरोबर द्राक्ष, लिंबू अशी विविध पिके त्यांनी आजवर घेतली आहेत. परंतु शेतीसाठी पाण्याची शाश्‍वत व्यवस्था नाही. यामुळे येथील शेती व्यवसाय बेभरवाशाचा ठरत असे. यामुळे पाटील दाम्प्÷यांनी नवा मार्ग स्वीकारला व यशस्वी केला. 

खाण्यायोग खोबरेल तेल 

शक्‍यतो आपल्या परिसरात खोबरतेलाचा वापर खाण्यासाठी केला जात नसे. मात्र केरळ, गोवा व कोकणात खोबरेल तेल खाण्यासाठी वापरतात. ते आरोग्यवर्धक असल्याने अनेक डॉक्‍टर खाण्यायोग्य खोबरेतेल खरेदी करतात. त्यांच्यासाठी आवर्जून खोबरेल तेलाचे गाळप केले जाते. या तेला आता बरीच मागणी आहे. 

या उद्योगाबाबत सांगताना सारिका पाटील यांनी सांगितले की आमच्या उद्योगामुळे लोकांना विषमुक्त आरोग्यदायी आहारासाठी रासायनमुक्त तेल पुरवठा होतो. यामुळे आरोग्यात सुधारणा होते. रोगांपासून मुक्ति मिळते यामुळे या उद्योगात समाधानी आहोत. या उद्योगातून लोकांच्या आरोग्याची समस्या सोडवत असल्याचे समाधान मिळत असल्याचे सांगितले. 
तर अरविंद पाटील यांनी सांगितले की तरुणांनी नोकरी नाही म्हणून खचून जाता शेतीला कुठल्या कुठल्या उद्योग व्यवसायच्या उत्पान्नाची जोड द्यावी व बेरोजगारीवर मात करावी, असे सांगितले. 

ठळक बाबी 

  • गुंतवणूक 5 लाख 
  • मासिक उलाढाल 1 लाख 25 हजार 
  • उपउत्पादने : शेंगदाणे, पेंड विक्री 
  • पंढरपूर, पुणे मुंबई येथे ग्राहक खरेदी करतात तेल 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarika Patil's journey from farmer to entrepreneur due to "Wood Oil Ghana" industry