
रोपळे (ता. पंढरपूर) गावच्या प्रथम नागरिक (सरपंच) पदाचा मान अनुसूचित जमाती प्रवर्गातील शशिकला दिलीप चव्हाण या जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार बनवणाऱ्या एका गरीब पारधी समाजाच्या महिलेला मिळाला. त्यांच्या नातेवाइकांनी "अपनी शशी सरपंच हवी..!' म्हणत ही आनंदाची बातमी समस्त पारधी समाजात पोचवली आणि सुरू झाला शुभेच्छांचा वर्षाव!
रोपळे बुद्रूक (सोलापूर) : रोपळे (ता. पंढरपूर) गावच्या प्रथम नागरिक (सरपंच) पदाचा मान अनुसूचित जमाती प्रवर्गातील शशिकला दिलीप चव्हाण या जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार बनवणाऱ्या एका गरीब पारधी समाजाच्या महिलेला मिळाला. त्यांच्या नातेवाइकांनी "अपनी शशी सरपंच हवी..!' म्हणत ही आनंदाची बातमी समस्त पारधी समाजात पोचवली आणि सुरू झाला शुभेच्छांचा वर्षाव!
निवडणूक निर्णय अधिकारी डी. जे. देसाई यांनी 27 फेब्रुवारी रोजी शशिकला चव्हाण यांची सरपंच म्हणून घोषणा केली. त्या वेळी जमलेल्या पारधी समाजातील लोकांना आकाश ठेंगणे झाले होते. पोलिस बंदोबस्त मोठा असल्याने त्यांचे उत्साहात स्वागत झाले नाही; मात्र त्यांच्या नातेवाइकांनी व समाजबांधवांनी त्यांच्या भाषेत "अपनी शशी सरपंच हवी..!' (आपली शशी सरपंच झाली) असे सांगत मोठा आनंद साजरा केला. त्यानंतर त्यांच्या आप्तेष्टांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी दिवसभर घरी रीघ लावली होती.
आपल्या समाजात सरपंचपद मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर लपत नव्हता. शशिकला चव्हाण या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोषण आहार बनवण्याचे काम करत होत्या. यातून त्या आपल्या कुटुंबाला हातभार लावत होत्या. पोषण आहार बनवण्यासाठी शाळेत यायला एखादवेळी उशीर झाला अथवा पोषण आहार चविष्ट बनला नाही तर त्यांना अनेकांची बोलणी खावी लागत होती. हालअपेष्टा सहन करत जगणाऱ्या शशिकला चव्हाण यांना आज गावचे सर्वोच्च पद मिळाले. त्याचा आनंद त्यांचे कुटुंबीय व आप्तेष्ट साजरा करत आहेत आणि प्रत्येकाला सांगताहेत "अपनी शशी सरपंच हवी..!'
गावकऱ्यांनी मला भरघोस मतांनी निवडून दिले अन् आज सरपंच बनवून टाकलं. गावोगावी भटकत राहणाऱ्या आमच्या समाजाला सरपंचपद मिळणे ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. यामुळे गावकऱ्यांची सेवा करायला मिळतेय याचा मला आनंद आहे.
- शशिकला चव्हाण,
नूतन सरपंच, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर
संपादन : श्रीनिवास दुध्याल