सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय : वर्गणी, देणगी अन्‌ मिरवणुकीविना होणार गणेशोत्सव

Ganeshutsav
Ganeshutsav

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी मंडप, आरास, वर्गणी, देणगी व मिरवणुकीला फाटा देत रक्तदान, प्लाझ्मादान व आरोग्य तपासणी शिबिरासह वृक्षारोपण कार्यक्रम घेण्याचा निर्णय येथील सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवाबाबतची मध्यवर्ती मंडळाची बैठक शिवानुभव मंगल कार्यालयात नुकतीच झाली. ट्रस्टी अध्यक्ष माजी आमदार नरसिंग मेंगजी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी कार्यवाह संजय शिंदे, श्रीशैल बनशेट्टी, सुधीर देशमुख यांच्यासह पदाधिकारी व अन्य मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यंदाच्या गणेशोत्सवाला शनिवार (ता. 22) पासून सुरवात होत आहे. परंतु, कोरोना महामारीमुळे त्यावर मर्यादा आल्याने तो साजरा करण्याबाबत अनेक मंडळांमध्ये साशंकता आहे. याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. दहा दिवसांचा हा उत्सव यंदा वेगळा मंडप न उभारता व आरास न करता केवळ पूजाअर्चना करून अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचे या वेळी ठरविण्यात आले. मध्यवर्ती अंतर्गत असलेल्या शहरातील सुमारे 400 मंडळांतर्फे त्या-त्या परिसरात रक्तदान, प्लाझ्मादान व आरोग्य तपासणी शिबिरासह वृक्षारोपण कार्यक्रम घेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. 

मंडळांनी तीन फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तीची स्थापना करू नये. स्थापना व विसर्जनासाठीची मिरवणूक काढू नये, नागरिकांसह कोणाकडूनही वर्गणी अथवा देणगी जमा करु नये, असेही या वेळी ठरवण्यात आले. गणेशमूर्तींचे विसर्जन यंदा दरवर्षीप्रमाणे तलावात करता येणार नसल्याने आपल्या परिसरातच कृत्रिम तलावात करावे लागणार आहे. त्यासाठीची मंडळांनी तयारी करण्याचेही या वेळी ठरवण्यात आले. दहा दिवसांच्या उत्सव काळात पूजाअर्चेसाठी होणारा खर्च मंडळाच्या कार्यकर्त्यांनीच करण्याचे ठरविण्यात आले. 

मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नरसिंग मेंगजी म्हणाले, मध्यवर्ती अंतर्गत असलेल्या सर्व मंडळांकडे जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यंदा विधायक उपक्रम राबवण्याचे आवाहन आम्ही मध्यवर्तीचे पदाधिकारी करणार आहोत. अनेक गणेशोत्सव मंडळांच्या कायम गणेशमूर्ती असल्याने त्यांची त्या मंदिरातच स्थापना, पूजन होणार असल्याने गणेशोत्सवात शहरातील सर्व मंदिरे उघडी ठेवण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. 

कार्यवाह संजय शिंदे म्हणाले, शासनाच्या निर्देशानुसार यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने करणार आहोत. मध्यवर्ती मंडळाकडून वृक्षारोपण, रक्तदान शिबिरासह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका व मोठ्या हॉस्पिटलच्या सहाय्याने स्वॅब चाचणी शिबिर घेण्याचेही नियोजन आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com