यंदा मृग नक्षत्रातील पावसाने केले समाधान, आर्द्राला आजपासून प्रारंभ 

प्रमोद बोडके
रविवार, 21 जून 2020

आर्द्राच्या सुरुवातीकडे लक्ष 
आजपासून आर्द्रा नक्षत्राला सुरवात झाली आहे. शनिवारी रात्री व रविवारी दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. जिल्ह्याच्या काही भागात रविवारी कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरीही लावली आहे. आर्द्रा नक्षत्रातील पाऊस दमदार हजेरी केव्हा लावतो? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा मृग नक्षत्रातील पावसाने भरभरून दिले आहे. 1 जून ते 20 जून या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यात सध्या समाधानाचे वातावरण आहे. 7 जूनपासून या वर्षी मृग नक्षत्राला प्रारंभ झाला. मृग नक्षत्रात झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील बळिराजा सध्या खरिपाच्या पेरण्यांमध्ये व्यस्त आहे. आजपासून सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होत आहे. आर्द्रा नक्षत्रातही पावसाने दमदार हजेरी लावावी अशी अपेक्षा बळिराजाकडून व्यक्त होत आहे. 

आजपासून सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्राचे वाहन घोडा असल्याने शेतकऱ्यांना या नक्षत्रातील पावसाकडून अपेक्षा लागल्या आहेत. 1 ते 20 जून या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात एकूण सरासरी 95 मिली मीटर एवढा पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सरासरीच्या 140 टक्के एवढा पाऊस आहे. गेल्या वर्षी 1 ते 20 जून कालावधीत फक्त 25 मिली मीटर एवढा पाऊस झाला होता. सरासरीच्या तुलनेत गेल्यावर्षी फक्त 37 टक्के एवढाच पाऊस झाला होता. या वर्षी वरुणराजाने भरभरून दिल्याने बळिराजा सुखावला आहे. 

सोलापूर जिल्ह्यात खरिपाचे जवळपास अडीच ते तीन लाख हेक्‍टरच्या दरम्यान पेरणी क्षेत्र आहे. सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, भुईमूग, सूर्यफूल, तूर ही पिके घेतली जातात. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारच्यावतीने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब, कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे हिरमुसलेला बळिराजा यंदाच्या पावसाने सुखावला आहे. यंदाच्या खरिपातून चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा बळिराजाला लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satisfied with the rain in Mrig Nakshatra this year, Ardra will start from today