कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांना वाचवा, आमदार-खासदारांची पालकमंत्र्यांकडे मागणी 

प्रमोद बोडके
शुक्रवार, 29 मे 2020

माजी पालकमंत्र्यांची मागणी झाली मान्य 
सोलापूरचे माजी पालकमंत्री भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आजच्या बैठकीत सोलापूरसाठी तज्ज्ञ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. सोलापुरातील कोरोना रोखण्यात अधिकाऱ्यांना अपयश येत असून प्रभाग निहाय कोरोना चाचणी करण्यासाठी रॅपिड टेस्ट कराव्यात अशी मागणीही आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी केली. सोलापूरचे महापालिका आयुक्त दिपक तावरे यांची आज बदली करण्यात आली आहे. सोलापूरच्या महापालिका आयुक्तपदी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक पी. सिवा शंकर यांची नियुक्ती झाली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष अधिकारी म्हणून पी. सिवा शंकर यांची नियुक्ती यापूर्वीच झाली आहे. 

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित झालेल्या रुग्णांना बरे करण्यासाठी व सोलापुरात कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी करण्यासाठी ठोस उपाय योजना करावी अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी केली. 
पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत कोरोना उपाययोजनांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्न उपस्थित केले. करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे म्हणाले, ज्या नॉन कोव्हिड रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेणे शक्‍य आहे अशा रुग्णांना उपचार करण्याची परवानगी द्यावी. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाला व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला. व्हेंटीलेटर कोठून उपलब्ध करून द्यायचे? यासाठी तब्बल दीड दिवस लागला. त्या रुग्णांची आर्थिक स्थिती बरी असल्याने इतर ठिकाणी उपचार घेण्यास त्यांनी परवानगी मागितली होती. त्या रुग्णाला इतर दवाखान्यात जाऊ दिले नसल्याचा आरोप आमदार संजयमामा शिंदे यांनी केला. 
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील प्रशासकीय कारभारावर ताशेरे ओढत आमदार फंडातून खरेदी केलेल्या पीपीइ किट व इतर साहित्य अद्यापही ग्रामीण भागात पोहोचले नसल्याचे सांगितले. उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, बार्शी तालुक्‍यातील जामगावमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला. त्या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्याने त्या भागातील व्यवहार सुरू होते. त्यामुळे इतर रुग्णांना लागण झाली. कोरोनासाठी आवश्‍यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना तत्काळ कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली. या बैठकीला आमदार भारत भालके, आमदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Save the patients who die due to corona, demands of MLAs and MPs to the Guardian Minister