धक्कादायक : आषाढीच्या तोंडावर पंढरपुरात सात जणांना कोरोना...

अभय जोशी
मंगळवार, 30 जून 2020

आज मंगळवारी आषाढी दशमी दिवशी सायंकाळी शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंढरपुरात येणार आहेत.

पंढरपूर (सोलापूर) - ऐन आषाढी यात्रेत आज पंढरपूर शहरातील सात जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एका पक्षाचे शहराध्यक्ष, बँकेचे संचालक, एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गाडीचा ड्रायव्हर आदींचा त्यामध्ये समावेश आहे. यात्रेच्या नियोजनात प्रशासन व्यस्त असताना शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. शहरातील रुग्णांची संख्या आता ८ झाली आहे.

पंढरपूर शहरातील एका व्यापारी बँकेचा संचालक आणि शिक्षक असलेल्या व्यक्तीचा दोन दिवसापूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह  आला होता. संबंधित संचालकाची नगरपालिका दवाखान्यात डॉक्टर असलेल्या तहसीलदार  वैशाली वाघमारे यांनी तपासणी केली होती. त्यांनीच संबंधित संचालका मध्ये कोरोना लक्षणे दिसून आल्यामुळे Swab घेण्यासाठी शिफारस केली होती.  तहसीलदार वाघमारे यांचाही स्वॅब घेण्यात आला होता. यात्रा नियोजनात महत्त्वाचा रोल असलेल्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांचा रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आला आहे.

वाचा - वाखरी ते पंढरपूर पादुका पायी आणण्याबाबतच्या याचिकेवर आज होणार सुनावणी

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या संबंधित व्यापारी बँकेच्या संचालकाच्या उपस्थितीत बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली होती. त्यामुळे त्या संचालकाच्या संपर्कात आलेल्या बँकेच्या संचालकांसह अनेक व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना चा संसर्ग पंढरपूर शहर व तालुक्यात होऊ नये यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून अहोरात्र काम करत असलेल्या महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गाडीच्या ड्रायव्हरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता अनेक अधिकार्यांचे देखील swab घ्यावे लागण्याची शक्यता आहे.

आज मंगळवारी आषाढी दशमी दिवशी सायंकाळी शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंढरपुरात येणार आहेत. असे असताना नेमके आज रुग्ण वाढल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saven Corona positive patient found in pandharpur