योग्य उमेदवारांनाच मतदान करा : विज्ञान अध्यापक मंडळाचे आवाहन

श्याम जोशी 
Sunday, 29 November 2020

'सर्वसामान्यपणे एखादे मंडळ किंवा संस्था यांचा कोणताही निर्णय त्या संस्था किंवा मंडळाच्या कार्यकारणीच्या मीटिंगमध्ये निर्णय घेवूनच जाहीर केला जातो.

द.सोलापूर (सोलापूर ) : सध्या पुणे विभागाच्या शिक्षक मतदारसंघात निवडणूक असल्याने सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे माजी पदाधिकारी एखाद्या उमेदवारास मंडळाचा पाठिंबा असे जाहीर करीत आहेत. परंतू मंडळाने असा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये व मागील कार्यकाळाचे मूल्यमापन स्वत: करुन योग्य त्या उमेव्दारास मतदान करावे, असे आवाहन मंडळाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी चापले यांनी केले आहे.
 
याबाबत श्री. चापले यांनी पत्रक प्रसिध्द केले आहे. ते म्हणाले, सोशल मिडीयावरुन सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे संस्थापक व माजी अध्यक्ष लक्ष्मीप्रसाद मोहिते यांनी विज्ञान अध्यापक मंडाळाचा पाठींबा सध्याच्या निवडणुकीतील उमेदवार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांना जाहिर केला आहे असे सांगताना दिसते. परंतु सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाची याबाबत कोणतीही मीटींग झालेली नाही व पाठिंबा देण्याचा विषयच झालेला नाही. त्यामुळे मोहिते यांनी जाहीर केलेला निर्णय स्वयंघोषीत आहे व तो सावंत यांच्याबरोबर त्यांचे व्यक्तीगत संबंध असल्यामुळे त्यांना तसा निर्णय जाहीर करण्यास उमेदवारानी सांगितलेले असावे.

सोलापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

विद्यमान अध्यक्ष शिवाजी चापले व सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ श्री.मोहीते यांच्या वक्तव्याचे जाहीरपणे खंडण करत असल्याचे यामध्ये म्हटले आहे. 'सर्वसामान्यपणे एखादे मंडळ किंवा संस्था यांचा कोणताही निर्णय त्या संस्था किंवा मंडळाच्या कार्यकारणीच्या मीटिंगमध्ये निर्णय घेवूनच जाहीर केला जातो. कार्यकारीणी मीटींग अध्यक्षाच्या सूचना किंवा परवानगीशिवाय होऊ शकत नाही. तरी मतदार बंधू व विज्ञान अध्यापक मंडळाचे सर्व सदस्य यांनी कोणताही संभ्रम मनामध्ये निर्माण होऊ न देता आपण सुज्ञ व बुद्धीजीवी घटक आहोत. त्यामुळे मागील कार्यकाळाचे मूल्यमापन स्वत: करावे व योग्य त्या उमेव्दारास मतदान करावे, असे आवाहन श्री.चापले यांनी केले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The science faculty has appealed to only yoga candidates to vote