
सोलापूर : राज्यातील कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. लस आल्यानंतर आणि अनलॉकनंतर नियमांचे उल्लंघन होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम देत 1 मार्च रोजी लॉकडाउनबाबत निर्णय घेऊ, असा इशारा दिला आहे. मात्र, पुन्हा केलेला लॉकडाउन परवडणारा नसून हातावरील पोट असलेल्यांना जगणे मुश्किल होईल. त्यामुळे आम्ही नियम पाळतोय, तुम्हीपण नियमांचे पालन करा, असे आवाहन महिलांनी केले आहे.
नियम पाळा अन् लॉकडाउन टाळा
आता लस उपलब्ध झाली असून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी काही दिवस नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. लॉकडाउनमुळे सर्वांचीच अडचण होणार असून हातावरील पोट असलेल्या कुटुंबाची भूक भागविणे कठीण होईल. सामाजिक बांधिलकीतून सर्वांनी कोरोनाविरुध्दची लढाई यशस्वी करण्यासाठी नियमांचे पालन करावे.
- आशा गुमटे, शिक्षिका
कोरोना संसर्ग वाढण्यास आपण जबाबदार ठरणार नाही, यादृष्टीने सर्वांनीच स्वत:सह कुटुबियांची व समाजातील प्रत्येक घटकांची काळजी घ्यायला हवी. कोरोना वाढल्याने संपूर्ण राज्यात पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ येऊ नये, म्हणून खबरदारी घ्यायला हवी. सोलापूर शहर- जिल्ह्यात हातावर पोट असलेल्यांची संख्या खूप मोठी आहे. काम केले तरच त्यांना खायला पोटभर अन्न मिळते. तर अनेकांनी बॅंकांकडून कर्जही घेतले असून त्यात शेतकरी, सुशिक्षित तरूण, नवउद्योजकांचा समावेश आहे. लॉकडाउन केल्यानंतर त्यांच्याही अडचणीत वाढ होईल. या पार्श्वभूमीवर सर्वांनी स्वत:पासूनच नियमांचे पालन करायला सुरवात करायला हवी, असे आवाहन सोलापूरकरांनी केले आहे.
नियमांचे पालन केल्यास लॉकडाउनची गरज नाहीच
शहर-जिल्ह्यातील परिस्थिती सुधारू लागली असून नागरिक नियमांचे पालन करीत आहेत. मात्र, आणखी काही दिवस नियमांचे तंतोतंत पालन केल्यास निश्चितपणे लॉकडाउन करण्याची वेळ येणार नाही. लॉकडाउन हा कोरोनाला हद्दपार करण्याचा अंतिम उपाय नसून मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्यास कोरोना वाढणार नाही.
- मनिषा मोरे, शिक्षिका
कोरोनाविरुध्द संघटित चळवळ हवी
हद्दपार होऊ लागलेला कोरोना पुन्हा वाढत आहे. अनलॉकनंतर ठिकठिकाणी गर्दी होऊ लागली असून नियमांचे उल्लंघनही वाढले आहे. लॉकडाउन होऊ नये, म्हणून आपण सर्वांनी मिळून कोरोनाविरुध्द एक चळवळ उभारायला हवी. नियमांचे काटेकोर पालन करणे हाच कोरोनाला हद्दपार करण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय ठरेल.
- शहिदा शेख, शिक्षिका
सामाजिक बांधिलकी जोपासण्याची गरज
कोरोनाला हद्दपार करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. मात्र, नागरिकांनीही सामाजिक बांधिलकीतून ही लढाई जिंकण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यायला हवा. लॉकडाउन केल्यानंतर सधन, सुशिक्षित वर्गाला काही फारसा फरक पडणार नाही. परंतु, गोरगरिबांचे जगणे मुश्किल होईल म्हणून नियम पाळायला हवेत.
- डिंपल जगताप, शिक्षिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.