पेरणीच्या तोंडावर बियाण्यांचे दर गगनाला; लॉकडाउननंतर शेतकऱ्यांची पुन्हा कोंडी 

राजाराम माने 
शुक्रवार, 26 जून 2020

दीडपट किमती वाढल्या 
आता खरिपाच्या बाजरी, उडीद, वाटाणा, कपाशी, कांदा आदी पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. परंतु मागणीनुसार बियाणे उपलब्ध होत नसल्याने बियाणे कंपनीनेच दीडपट किमती वाढवल्या आहेत. 
- महेश चिवटे, बी-बियाणे विक्रेते, करमाळा 

केत्तूर (ता. करमाळा, जि. सोलापूर) : कोरोना महामारीचे संकट घोंघावत असतानाच बियाणे उत्पादक कंपन्यांनी बियाण्यांच्या दरात भरमसाट वाढ केली आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात आहे. पेरणीच्या तोंडावर अशी परिस्थिती असल्याने बियाण्यांसाठी आर्थिक तरतूद कशी करावी हा शेतकऱ्यांसमोर प्रश्‍न आहे. 
पूर्वी एक हजार 200 रुपयास मिळणारी कांदा बियाणाची एक किलोची पिशवी आता दोन हजार 200 रुपयांना आहे. लॉकडाउनने शेतकऱ्यांना शेतीमाल मुंबई-पुणे येथे बाजारपेठेत पाठविता आला नाही. पालेभाजी बाजारपेठेत कवडीमोल दराने विकावी लागली. लग्न, जागरण गोंधळ, वास्तुशांती अशा सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असल्याने पालेभाजी विकता आला नाही. उत्पादित मालाला योग्य दर न मिळालेले शेतकरी आर्थिक संकटात असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. त्यात बी-बियाण्यांचे दर वाढल्याने आणखी एक संकट शेतकऱ्यांवर आले आहे. 
यावर्षी मॉन्सूनच्या पावसाने वेळेत हजेरी लावल्याने शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी तयार झाला आहे. परंतु, बियाण्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने संकट उभे आहे. कोरोना लॉकडाउनने बियाणे उत्पादक कंपन्यांचे नियोजन पार कोलमडले आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात कंपन्या बियाणांचे पॅकिंग करतात. परंतु, यंदा पॅकिंगसाठी मजूरच मिळाले नाहीत. त्यामुळे सर्वांना बियाणे पुरवठा करणे शक्‍य नसल्याने कंपन्यांनी दीडपट किमती वाढविल्या आहेत. दरम्यान, बियाणांच्या आधारभूत किमतीपेक्षा जास्त पैसे कृषीसेवा केंद्र चालकांनी घेतल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी खात्याने दिला आहे. 

उगवणिसाठी पावसाची गरज 
जूनच्या सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने आनंदी वातावरण होते. खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या. परंतु, पावसाने पुन्हा ब्रेक घेतला आहे. पेरणी केलेले बी उगवण्यासाठी आता पावसाची गरज आहे. 
- शिवाजी चाकणे, शेतकरी, देलवडी 

एक किलो बियाण्यांची किंमत 
पीक                        गेल्यावर्षीची किंमत                यावर्षीची किंमत 
कांदा (एक किलो)      एक हजार 200                    दोन हजार 200 
बाजरी (दीड किलो)    300 ते 400                         500 ते 600 
मूग (पाच किलो)        1000 ते 1200                     1400 ते 1500 
मका (पाच किलो)       400 ते 4500                      5500 ते 600
उडीद (एक किलो)      एक हजार 480                   एक हजार 480 
कपाशी( एक किलो)     500 ते 600                       700 ते 750 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seed rates skyrocket at sowing farmers re emerge after lockdown