
घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्याने घराचा सेफ्टी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घराचा कोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने संजय जगन्नाथ सिंदगी (रा. साईसत्यम हाईट अपार्टमेंट, बलिदान चौक) यांच्या घरातील सहा लाख 21 हजारांचे दागिने लंपास केले.
सोलापूर : घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्याने घराचा सेफ्टी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घराचा कोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने संजय जगन्नाथ सिंदगी (रा. साईसत्यम हाईट अपार्टमेंट, बलिदान चौक) यांच्या घरातील सहा लाख 21 हजारांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी जोडभावी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
मुलगा आणि व्यापारी (संजय सिंदगी) दुकानात गेले होते. तर कुटुंबातील सदस्य हुरडा खायला परगावी गेले होते. दरम्यान, जेवणासाठी दोन वाजता सिंदगी हे घरी आले. त्यानंतर जेवण करून ते दुकानात गेले. काहीवेळाने मुलगा चार वाजण्याच्या सुमारास जेवायला घरी आला. त्या वेळी त्याला घर उघडे दिसले आणि त्याने घरात प्रवेश केला. त्या वेळी घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने वडिलांना माहिती दिली आणि पोलिसांत धाव घेतली.
19 फेब्रुवारीला दुपारी अडीच ते चार या वेळेत ही चोरी झाली, असा पोलिसांना अंदाज आहे. पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा तपास सुरू केला आहे. जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निखिल पवार हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये एक लाख 60 हजार रुपयांचे आठ तोळ्यांचे गंठण, दीड तोळ्याचे 30 हजारांचे दागिने, 40 हजार रुपयांचे शॉर्ट गंठण, दहा हजार रुपयांचे अर्ध्या तोळ्याचे गंठण, 40 हजार रुपयांचे साखळीचे लॉकेट, तोळ्याची अंगठी आणि दोन लाख 21 हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल