पदवीधरच्या निवडणुकीनंतर सोलापूर "झेडपी'च्या पक्षनेत्यांची निवड 

संतोष सिरसट
Friday, 6 November 2020

दराडे यांना मिळणार संधी 
नव्या वर्षात जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे यांना संधी दिली जाणार आहे. मागील निवडीच्यावेळीच तसा निर्णय घेतला होता. त्यामुळे नव्या वर्षात दराडे यांना काम करण्याची संधी मिळेल. बाराचारे यांच्या निवडीनंतर कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यामुळे त्यांना आपल्या कार्याचा ठसा उमटविण्यात काही मर्यादा आल्या. पण, दराडे यांना आपल्या कामाचा ठसा उमटविण्याची मोठी संधी यानिमित्ताने मिळणार आहे. 

सोलापूर ः पुणे पदवीधर निवडणुक जाहीर झाली आहे. येत्या एक डिसेंबरला त्यासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे भाजपची सगळी यंत्रणा त्याच्या कामाला लागली आहे. त्यामुळे पदवीधरची निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पक्षनेतेपदाची नियुक्ती जाहीर केली जाणार आहे. नव्या वर्षात ही संधी भाजपचे बार्शी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे यांना मिळणार आहे. 

जिल्हा परिषदेत सध्या भाजप आघाडीची व राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. दोन्ही पक्षाची सत्ता जिल्हा परिषदेत असल्याने सत्ताधारी कोण व विरोधक कोण याबाबत तर्क-वितर्कच सुरु आहेत. भाजपच्या मदतीने शिवसेनेचे अनिरुद्ध कांबळे हे अध्यक्ष झाले आहेत तर समाधान आवताडे गटाचे दिलीप चव्हाण उपाध्यक्ष झाले आहेत. याशिवाय मोहोळच्या लोकशक्ती परिवाराचे प्रमुख विजयराज डोंगरे यांची जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली आहे. महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद कॉंग्रेसकडे तर कृषी समितीचे सभापतीपद राष्ट्रवादीकडे अर्थात माजी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्या कार्यकर्त्याकडे गेले आहे. त्यामुळे प्रमुख पदांवर भाजप वगळता इतर सर्वच पक्ष व आघाड्यांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. पक्षनेतेपद मात्र भाजपने आपल्याकडे ठेवले आहे. पहिल्यांदा अक्कलकोटच्या आनंद तानवडे यांना पक्षाने संधी दिली होती. त्यानंतर पक्षनेतेपदावरुन मोठे वादंग निर्माण झाले होते. शेवटी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाच्या अण्णाराव बाराचारे यांच्याकडे पक्षनेतेपद देण्यात आले. त्यांची नियुक्ती करताना त्यांना केवळ एक वर्षाची संधी देण्याचे ठरले होते. त्यानुसार येत्या डिसेंबरअखेरपर्यंत बाराचारे यांच्याकडे पक्षनेत्याची जबाबदारी राहणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selection of party leaders of Solapur "ZP" after graduation election