शिक्षक पारडे, शिवगुंडे, भांबुरे यांच्या प्रकल्पांची "राज्यस्तरीय' निवड ! जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक 

रमेश दास 
Friday, 23 October 2020

सोलापूर जिल्ह्यातील दीपक पारडे, सुप्रिया शिवगुंडे व राजेंद्र भांबुरे या उपक्रमशील शिक्षकांच्या प्रकल्पांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

वाळूज (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील दीपक पारडे, सुप्रिया शिवगुंडे व राजेंद्र भांबुरे या उपक्रमशील शिक्षकांच्या प्रकल्पांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नुकतेच केंद्र शासनाने जाहीर केले. या अनुषंगाने शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात शिक्षकांसाठी ऑनलाइन स्पर्धा आयोजित केली होती. यामधील जिल्हास्तरीय स्पर्धेचा कालावधी हा 25 सप्टेंबर 2020 पर्यंत होता. या स्पर्धेच्या कार्यवाहीची जिल्हास्तरीय जबाबदारी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, वेळापूर (जिल्हा सोलापूर) यांच्यावर सोपविण्यात आली होती. पोस्टर, अलेखित माहिती व व्हिडिओ क्‍लिप या प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत एससीईआरटीने सूचित केलेल्या समितीमधील तज्ज्ञांमार्फत करण्यात आले. 

पोस्टर निर्मिती प्रकारात राजेश भांबुरे (जि. प. केंद्र शाळा, शिंदेवाडी, ता. माळशिरस) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. "व्यावसायिक शिक्षणाची पुन्हा कल्पना करणे' हा त्यांच्या साहित्य प्रकाराचा विषय होता. अलेखित माहिती या साहित्य प्रकारात दीपक पारडे (जि. प. प्राथमिक शाळा, माळीवस्ती, औंढी, ता. मोहोळ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. "ऑनलाइन आणि डिजिटल शिक्षण - तंत्रज्ञानाचा योग्य वापर सुनिश्‍चित करणे' हा त्यांच्या अलेखित माहितीचा विषय होता. तसेच "व्हिडिओ क्‍लिप' या संप्रेषण साहित्य प्रकारामध्ये सुप्रिया शिवगुंडे (जि. प. प्राथमिक शाळा, शिंदेवस्ती, ता. माळशिरस) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. "ऑनलाइन आणि डिजिटल शिक्षण-तंत्रज्ञानाचा योग्य वापर सुनिश्‍चित करणे' हा त्यांच्या व्हिडिओ निर्मितीचा विषय होता. 

या प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या तीनही शिक्षकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 87 शिक्षकांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये व्हिडिओ संप्रेषण साहित्यासाठी 26 पोस्टरकरिता 31, अलेखित माहितीकरिता 30 शिक्षकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परीक्षण प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वेळापूर, ज्येष्ठ अधिव्याख्याता (डायट, वेळापूर), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सोलापूर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सोलापूर या तज्ज्ञ समितीकडून करण्यात आले. 

सर्व सहभागी व विजेत्या शिक्षकांचे जिल्ह्यातील सर्व शिक्षक लोकप्रतिनिधी व पालकांकडून कौतुक केले जात आहे. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व सोलापूर जि. प.च्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी या सर्वांचे कौतुक केले. कोरोना कालावधीत अशा आदर्श शिक्षकांकडून उत्कृष्ट कार्य होत असल्याने पालक व विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 

कोरोना कालावधीतही विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे व शिक्षकही त्यास उत्तम प्रतिसाद देत आहेत. 
- डॉ. रामचंद्र कोरडे,
प्राचार्य, डायट, वेळापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selection of projects of teachers Parde, Shivgunde and Bhambure for state level competition