
महाविकास आघाडीच्या बैठकीला तसेच पदवीधर व शिक्षक निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेतून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांची अनुउपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला आहे.
सोलापूर : पदवीधर व शिक्षक निवडणुकीतील महाआघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांची छायाचित्रे नसल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मेळाव्यात घातलेल्या गोंधळावर राष्ट्रवादी कॉंग्रेससह कॉंग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांच्या माफीनंतर पदडा पडला असून पाचही जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत. मात्र, महाविकास आघाडीच्या बैठकीला तसेच पदवीधर व शिक्षक निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेतून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांची अनुउपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला आहे.
महाआघाडीच्या तीन पक्षांच्या कडबोळ्यात कॉंग्रेसवर सतत अन्यायाच होत असल्याची भावना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांत आहे. अशातच पदवीधर व शिक्षक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी हेरिटेज लॉन्स येथे घेण्यात आलेल्या एकत्रित मेळाव्यात कॉंग्रेस कार्यकत्यांच्या नाराजीला मंत्री महोदयासह महाआघाडीतील ज्येष्ठ नेत्यांना सामोरे जावे लागले. मेळाव्याच्या स्थळावर लावण्यात आलेल्या डिजिटल फलकांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना या तिनही पक्षातील नेत्यांची छायाचित्रे असणे अपेक्षित होते. मात्र कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांना या फलकात डावलण्यात आल्याने कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांनी बैठकीच्या सुरवातीला चांगलाच गोंधळ घातला.
महाविकासआघाडीत सतत मिळणारी दुय्यम वागणूक, प्रणिती शिंदे यांना न मिळलेले मंत्रीपद तसेच अनावधाने का होईना पण ज्येष्ठ नेत्यांच्या छायाचित्राचा पडलेला विसर यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरच महाआघाडीत तू तू- मैं मैं झाली. मात्र, कॉंग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांनी स्वत: कार्यकर्त्यांचे सुशीलकुमार शिंदे यांच्याशी बोलणे करून दिले. "माझीच काही तक्रार नाही तर तुम्ही का तक्रार करता' असे सांगत सुशीलकुमार शिंदे यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले व कार्यक्रम सुरळीत झाला. सुशीलकुमार शिंदे यांच्या आवाहनानंतर व राष्ट्रवादी कॉंग्रेससह कॉंग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांच्या माफीनंतर या वादावर पडदा पडला.
आम्ही एकत्रच
महाविकास आघाडी ही एकत्रच आहे. आम्ही एकत्र होतो. एकत्र आहोत आणि एकत्रच राहू. कार्यकत्यांचा राग क्षणिक होता. सर्व कार्यकर्ते अरुण लाड व जयंत आसगावकर या दोघांच्या प्रचाराचे काम करत आहेत.
- प्रणिती शिंदे, आमदार
मंत्रीपद न मिळाल्याची खदखद आहेच
प्रणिती शिंदे यांनी मंत्रीपद न मिळाल्याची खदखद आहेच. मात्र, ही चूक अनावधानाने झालेली आहे. माफी नंतर सर्व काही विसरून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. गैरसमजातून झालेल्या वादावर आता पडदा पडला आहे. पाचही जिल्ह्यातील कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. कुठलेही मतभेद नाहीत.
- प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस
संपादन : अरविंद मोटे