पालकमंत्री भरणे म्हणाले, सोलापुरात वरिष्ठ अधिकारी नियुक्त करायला अजितदादांनी दिली परवानगी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हाताबाहेर गेलेली ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी अनुभवी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मान्यता दिली असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हाताबाहेर गेलेली ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी अनुभवी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मान्यता दिली असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. 
एक ते दोन दिवसात हे अधिकारी रुजू होतील, अशी माहितीही पालकमंत्री भरणे यांनी दिली. हे अधिकारी कोण असणार? याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. 12 एप्रिलला सोलापुरात पहिला रुग्ण सापडला व त्याचा मृत्यूही झाला. आज 30 एप्रिल रोजी सोलापुरातील कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या ८१ झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पहिला रुग्ण सापडल्यानंतर अवघ्या 18 दिवसात सोलापुरातील कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सोलापुरात वरिष्ठ अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिक यांच्याकडून केली जात होती. पालकमंत्री भरणे यांच्याकडे ही अशा प्रकारची निवेदने प्राप्त झाल्याने पालकमंत्री भरणे यांनी हा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचविला. उपमुख्यमंत्री अजितदादांनी अधिकारी नियुक्ती करण्यास मान्यता दिली असून सोलापुरातील कोरणा आटोक्यात आणण्यासाठी नवीन अधिकारी, नवीन उपाय योजना येत्या काळात बघायला मिळणार आहेत.

यांच्याबरोबरच असणार काम
नव्याने नियुक्त केले जाणारे केले जाणारे अधिकारी हे आता असलेल्या अधिकाऱ्याच्या समन्वयासाठी व त्यांच्या सोबत काम करण्यासाठी आहेत. कोणाचेही काम वाईट आहे म्हणून नवीन अधिकाऱ्याला नियुक्त केले असा समज कोणीही करुन घेऊ नये. 
- दत्तात्रय भरणे, पालकमंत्री, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A senior officer will now be appointed in Solapur