बापरे! लॉकडाऊनमध्ये होतायेत बालविवाह; १३ ते १७ वयोगटातील ‘एवढे’ विवाह रोखले

अशोक मुरुमकर
रविवार, 31 मे 2020

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्याला रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्याचा परिणाम सर्व घटकांवर झाला आहे. मात्र, या लॉकडाऊनमध्ये बाल विवाहचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लोकांमध्ये जागृती आणि कायद्याचे अज्ञान याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. सोलापूर जिल्ह्यात असे सात बाल विवाह रोखण्यात महिला व बाल विकास विभागातील जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश आले आहे. हे समोर आलेले बाल विवाह आहेत, असे आणखी किती विवाह होत असतील असा प्रश्‍न यातून निर्माण होत आहे.

सोलापूर : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्याला रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्याचा परिणाम सर्व घटकांवर झाला आहे. मात्र, या लॉकडाऊनमध्ये बाल विवाहचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लोकांमध्ये जागृती आणि कायद्याचे अज्ञान याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. सोलापूर जिल्ह्यात असे सात बाल विवाह रोखण्यात महिला व बाल विकास विभागातील जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश आले आहे. हे समोर आलेले बाल विवाह आहेत, असे आणखी किती विवाह होत असतील असा प्रश्‍न यातून निर्माण होत आहे.
ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बाल विवाह होऊ नयेत म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप त्याला पूर्णपणे रोखण्यात यश आले नसल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या दरम्यान वेगवेगळ्या पद्धतीने विवाह झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, त्यातच बाल विवाह ही होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 21 व्या शतकात आजही समाजात दुर्लब घटक म्हणून महिला व मुलींना दुय्यम स्थान दिले जात आहे. महिला बाल विकास कार्यालय व बाल संरक्षण कक्ष यांच्या वतीने जिल्हा स्तरावर बाल विवाह, बालकांवर होणारे अत्याचार शोषण, महिला सक्षमीकरण, स्त्री पुरुष समानता, कौटुंबिक अत्याचार अशा सामाजिक समस्या विशेषतः बाल विवाह विषयांवर जिल्हा व तालुकास्तरावर शाळा, महाविद्यालय, वस्ती पातळीवरील कार्यशाळा, प्रबोधनपर जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. अशा उपक्रमातुन जागृक नागरिकांकडुन समाजात घडणाऱ्या बाल विवाहाची गुप्त माहिती कार्यालयास प्राप्त होत आहे. 
महिला व बाल विकास विभागाला मिळालेल्या माहितीमुळे बाल संरक्षण कक्ष कार्यालय कार्यवाही करते. तालुकापातळीवर कार्यरत असणारे संरक्षण अधिकारी, चाईल्ड लाईन, ग्रामपंचायत यंत्रणा, अंगणवाडी यंत्रणा, पोलिस यंत्रणा यांची क्षमता बांधणी केल्यामुळे जिल्ह्यातील सात बाल विवाह थांबविण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलींवर होण्याऱ्या सामाजिक व मुलींच्या आरोग्य विषयक समस्यांना नक्कीच आळा बसणार आहे. 
राज्यात सर्वत्र कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नारिकांना सामाजिक, मानसिक, आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दिवसेंदिवस विशेषतः मुलांच्या काळजी व संरक्षणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.  सोलापुर जिल्ह्यात जिल्हा बाल संरक्षण कक्ष कार्यालयाने माढा, उत्तर सोलापूर, सांगोला, करमाळा, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात 13 ते 17 या वयोगटातील अल्पवयीन मुलींचे विवाह थांबविले आहेत.  बाल विवाहाच्या कुंटुबाचे समुपदेशन करून पालकांना मुलींच्या शिक्षणाचे महत्व,  मुलींच्या आरोग्य विषयक समस्या, बाल विवाहाचे होणारे गंभीर परिणामा याची जाणीव करून देण्यात आली आहे. समुपदेशनातुन पालकांचे मत परिवर्तन करुन बाल विवाह थांबविण्यात यश मिळवले. 
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बाल विवाहाची माहिती कळवा...

सोलापूर जिल्हा महिला बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे म्हणाले, मुलींना शिक्षण देऊन सक्षम करणे गरजेचे आहे तसेच काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी समाजातील प्रत्येकाची आहे. मुलींच्या बाबतीत समाजात घडणाऱ्या अशा बाल विवाहाची माहिती त्वरित जिल्हा बाल संरक्षण कक्ष कार्यालयास कळवावी. बालकांच्या संरक्षणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. सदर प्रकरण बाल कल्याण समिती समोर सादर करुन बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यात चाईल्ड लाईन, गाव पातळीवरील यंत्रणा व पोलिस यंत्रणा यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यवाहीत सीडीपीओ, तालुका संरक्षण अधिकारी, अंगणवाडी सेविका, बाल संरक्षण कक्ष सोलापुर संरक्षण अधिकारी विजय मुत्तुर, चाईल्ड लाईन समन्वयक आनंद ढेपे, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता यांनी परिश्रम घेतले.

काय आहे कायदा...
बालविवाह हा कायद्याने गुन्हा ठरतो. १९२९ मध्ये हा कायदा केला गेला. त्यात सुधारणा होऊन देशात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ करण्यात आला व १ नोव्हेंबर २००७ पासून तो अमलात आला. वधू- वर सज्ञान म्हणजेच मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ असेल, तर विवाह ग्राह्य मानला जातो. याचा अर्थ वयात येणे म्हणजे मुलगी गर्भधारणेस योग्य व मुलगा प्रजोत्पादनक्षम असून ते शारीरिक व मानसिक परिपक्वता प्राप्त होतात, असा आहे. बालविवाह झाल्यास मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो, परिणामी त्यांना गर्भधारणा झाली, तर बाळाच्या पोषणासाठी शरीर सक्षम नसते. त्याचे परिणाम तिच्या आणि विशेषत: बाळाच्या आरोग्यावर होतो. बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी समाजसेवी संस्था, ग्रामपंचायत, सरकारी कार्यालये, निमशासकीय संस्था इत्यादींना बालविवाह अधिकार आहेत. बालविवाहाचे अनेक दुष्परिणाम असल्याने समाजात होणाऱ्या घातक परिणामांबद्दल जाणीव आणि जनजागृती निर्माण करणे हा या कायद्याचा उद्देश आहे. जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडण्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास शिक्षा होऊ होते. १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास तो गुन्हेगार ठरून तो शिक्षेस पात्र ठरतो. या कायद्याअंतर्गत असलेले गुन्हे दखलपात्र व अजामिनपात्र आहेत. अधिक माहितीसाठी वकिलाचा सल्ला घ्यावावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven child marriages stopped in lockdown in Solapur district