शरद पवारांनी रोवली पंढरपूर तालुक्‍यात हरितक्रांतीची मुहूर्तमेढ !

Sharad_Pawar
Sharad_Pawar

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यात 1980 साली देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या रूपाने औद्योगिक आणि हरित क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. (कै.) औदुंबरअण्णा पाटील यांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या या कारखान्याच्या पहिल्या गाळप हंगामाचा प्रारंभ माजी उपपंतप्रधान (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता. गेल्या चाळीस वर्षांपासून शरद पवार आणि पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांशी असलेले स्नेहाचे आणि प्रेमाचे ऋणानुबंध आजही कायम आहेत. 

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली (कै.) औदुंबरअण्णा पाटील, (कै.) सुधाकरपंत परिचारक, (कै.) यशवंतभाऊ पाटील, (कै.) वसंतराव काळे, (कै.) कृष्णातभाऊ पुरवत यांनी सहकार आणि राजकीय क्षेत्रात काम केले. श्री. पवारांनी तालुक्‍यातील या नेत्यांना राजकारणात आणि सहकार क्षेत्रात मोठी ताकद देऊन उभे करण्याचे काम केले. 

(कै.) औदुंबरअण्णा पाटील आणि शरद पवारांचे निकटचे संबंध होते. शरद पवार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखाना हे त्याकाळी समीकरणच बनले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार विठ्ठल कारखान्यावर अनेक वेळा येऊन गेले आहेत. कारखान्याच्या कार्यक्रमात पवारांनी केलेली भाषणे त्याकाळी खूप गाजली होती. 

(कै.) निवृत्ती महाराज हांडे आणि शरद पवारांच्या भाषणातील राजकीय जुगलबंदी त्याकाळी जिल्ह्याच्या राजकारणात खूप चवीने चर्चिली जायची. शेती, सहकार आणि राजकारण या तिन्ही पातळ्यांवर पवारांनी तालुक्‍यातील सर्वच नेत्यांना मदत करून उभे केले आहे. 

(कै.) औदुंबरअण्णा पाटील आणि (कै.) यशवंतभाऊ पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. यशवंतभाऊ पाटलांना सोलापूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान देखील शरद पवारांमुळेच मिळाला होता. आजही दोन्ही पाटील घराणे शरद पवारांच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत. पडत्या काळात देखील राजूबापू पाटील आणि युवराज पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. (कै.) राजूबापू पाटील शेवटपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवारांसोबत होते. 

(कै). औदुंबरअण्णा पाटील यांच्या निधनानंतर पाटील कुटुंब राजकारण आणि साखर कारखान्यातून बाजूला गेले; परंतु त्यांचे नातू युवराज पाटील आणि अमरजित पाटील यांनी पवारांना आपले दैवत मानूनच राजकारण आणि समाजकारण सुरू ठेवले आहे. 

दरम्यानच्या काळात पंढरपूर तालुक्‍यातील राजकीय घटना - घडामोडींमध्ये आमदार भारत भालके यांनी शरद पवारांना आपला नेता मानले होते. पवारांच्या विचारांनी प्रेरित होऊन राजकारणात आलेल्या भारत भालेकेंनीही शेवटपर्यंत पवारांवर निष्ठा ठेवली होती. दुर्दैवाने अलीकडे आमदार भारत भालके यांचे निधन झाले. त्यामुळे पंढरपूर तालुक्‍यातील सच्चा एकनिष्ठ कार्यकर्ता पवारांनी गमावला आहे. 

एस कॉंग्रेसच्या वेळी "या तरुणां'नी दिली होती साथ 
कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी एस कॉंग्रेसची स्थापना केली होती. त्या वेळी पंढरपूर तालुक्‍यातून विठ्ठल रोंगे, बाळासाहेब पाटील, सुभाष भोसले हे तरुण कार्यकर्ते पवारांच्या मदतीसाठी धावून आले होते. विठ्ठल रोंगे यांना एस कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्षपद दिले होते. त्या वेळी देखील शरद पवार आणि पंढरपूर तालुक्‍याचे अधिकचे जवळचे संबंध आले होते. 

पंढरपूर शहराच्या विकासात शरद पवारांचे योगदान 
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारच्या काळात पंढरपूर, देहू, आळंदी आणि भंडारा डोंगर विकास आराखडा मंजूर केला होता. या निधीतून पंढरपूर शहरात अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे पंढरपूर शहराच्या विकासात शरद पवारांचे योगदान राहिले आहे. आजही शरद पवार पंढरपुरात आले तर त्यांच्या जुन्या सवंगड्यांची ते आवर्जून आठवण काढतात. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करतात. शरद पवार यांचा उद्या (शनिवारी) 80 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com