राष्ट्रवादी युवकच्या सोलापूर शहराध्यक्षांना शरद पवारांनी दिले आश्‍वासन 

प्रमोद बोडके
Thursday, 24 September 2020

आपल्या सरकारच्या काळातच आयटी पार्क व्हावे 
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात 14 अभियांत्रिकी पदवी महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातून दरवर्षी पाच हजार अभियंते उत्तीर्ण होतात. सोलापुरात आयटी पार्क झाल्यास या अभियंत्यांना सोलापुरातच नोकरी मिळणार आहे. मेकॅनिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स्‌, इलेक्‍ट्रॉनिक्‍स्‌ ऍण्ड टेलिकम्युनिकेशन, इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी या शाखेतील अभियंत्यांना आयटी पार्कच्या माध्यमातून सोलापुराच नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय सोलापुरात असलेल्या बीबीए, बीसीए, एमसीए, एमसीएस या अभ्यासक्रमाचे दरवर्षी 1200 ते 1500 विद्यार्थी उत्तीर्ण होतात. या विद्यार्थ्यांनादेखील आयटी पार्कच्या माध्यमातून सोलापुरातच नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यामुळेआपल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात सोलापुरातील युवकांसाठी आयटी पार्क होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचा मुद्दाही बागवान यांनी शरद पवार यांच्या समोर मांडला. 

सोलापूर : सोलापुरातील युुवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच युवकांच्या हाताला काम मिळवून देऊन बेरोजगारी हटविण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्षशरद पवार यांनी दिल्याची माहिती सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी दिली. युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यासोबत जाऊन शहराध्यक्ष बागवान यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सोलापुरात बेरोजगारीचा आणि युवकांचा प्रश्‍न बागवान यांनी शरद पवार यांच्यासमोर मांडला. 

सोलापूर शहर व जिल्ह्यातील बेरोजगारी संपुष्टात आणण्यासाठी व युवा वर्गाला सोलापूरातच रोजगार उपलब्ध होण्यासाठी आय. टी. पार्कची नितांत आवश्‍यकता आहे. त्यासाठी वरिष्ठ स्तरावरून राज्य सरकार मार्फत योग्य ती पावले उचलावीत अशी विनंती राष्ट्रवादी युवकच्यावतीने शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. सोलापुरात बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हाताला काम आणि नोकरी नसल्याने युवकवर्ग वैफल्यग्रस्त होत असल्याचा मुद्दाही बागवान यांनी मांडला.

सोलापुरात आयटी पार्क झाल्यास हजारो युवकांना रोजगार मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचा मुद्दाही जुबेर बागवान यांनी शरद पवार यांच्या समोर उपस्थित केला. यावेळी राष्ट्रवादीचे सोलापुर जिल्हामिडीया प्रमुख मिलिंद गोरे,करमाळा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अभिषेक आव्हाड, प्रदेश सरचिटणीस संकल्प डोळस उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar assures NCP youth president of Solapur