esakal | माढा तहसील कार्यालय स्थलांतर केल्यास तीव्र आंदोलन ! शिवसेना व संभाजी ब्रिगेडचा इशारा 

बोलून बातमी शोधा

Madha Tehsil}

माढा तहसील कार्यालयाचे बांधकाम सुरू होणार असून, बांधकाम पूर्ण होईपर्यंत माढा तहसील कार्यालय इतरत्र कोठेही स्थलांतरित करू नये, या मागणीसाठी माढा शहर शिवसेना, संभाजी ब्रिगेडने माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना तर कॉंग्रेसचे नेते दादासाहेब साठे यांनी सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदन दिले आहे. 

माढा तहसील कार्यालय स्थलांतर केल्यास तीव्र आंदोलन ! शिवसेना व संभाजी ब्रिगेडचा इशारा 
sakal_logo
By
किरण चव्हाण

माढा (सोलापूर) : माढा तहसील कार्यालयाचे बांधकाम सुरू होणार असून, बांधकाम पूर्ण होईपर्यंत माढा तहसील कार्यालय इतरत्र कोठेही स्थलांतरित करू नये, या मागणीसाठी माढा शहर शिवसेना, संभाजी ब्रिगेडने माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना तर कॉंग्रेसचे नेते दादासाहेब साठे यांनी सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदन दिले आहे. 

माढा तहसील कार्यालयाची नवीन इमारत माढ्यातील तहसील कार्यालयाची आताची इमारत पाडून तेथेच बांधण्यात येणार आहे. नवीन इमारत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत होणार आहे. नवीन इमारतीचे बांधकाम होईपर्यंत तहसील कार्यालयाचे कामकाज माढा शहराबाहेर न हलवता माढ्यातच कोणत्यातरी इमारतीतून करावे, अशी मागणी या दोन्ही निवेदनांत करण्यात आली आहे. माढ्यातील तहसील कार्यालयाचे स्थलांतर झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. 

निवेदन देताना शिवसेनेचे शहरप्रमुख शंभूराजे साठे, पोपट भांगे, नागनाथ कदम, अक्रम कुरेशी, राहुल मस्के, रहेमान पठाण, सुहास पोतदार, सुदर्शन मोहिते, सुरेश पाटेकर, गौतम शिंदे, विनोद कदम, विजय लोंढे, अमर भांगे, दत्तात्रेय अत्रे, सैफन कोरबू, फारुक शेख, अशोक ठोंबरे, सुनील ठोंबरे, प्रमोद ठोंबरे, दीपक कांबळे, ओंकार पराडकर, वंदना मार्डीकर, अमृता भांगे, प्रमोद भोळ, तानाजी पाटील, आधार बागवान उपस्थित होते. 

संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिनेश जगदाळे यांनीही प्रांताधिकारी ज्योती कदम यांना निवेदन दिले. तर सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदन देताना दादासाहेब साठे, धनाजी कांबळे, देविदास कदम, सचिन साबळे उपस्थित होते. याबाबत माढ्यातील नागरिकांची माढा नगरपंचायतीसमोर बैठक घेण्यात आली. शुक्रवारी (ता. 26) याबाबत तहसीलदारांची आंदोलनकर्ते भेट घेणार आहेत. 

माढ्यातील तहसील कार्यालयाची इमारत तात्पुरत्या स्वरूपातही माढ्याबाहेर इतरत्र कोठेही हलविणार नाहीत. माढ्यातील तहसील कार्यालयाची मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आताच्या कार्यालयाच्या ठिकाणची जुनी इमारत पाडून नवी बांधण्यात येणार आहे. बांधकाम होईपर्यंत तहसील कार्यालयाचे कामकाज माढा महाविद्यालयाच्या गावातील इमारतीत घेण्याबाबत महाविद्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. याबाबत रयत शिक्षण संस्थेशी मी स्वतः पत्रव्यवहार केला आहे. कोणत्याही परिस्थितीत माढा तहसील कार्यालयाचे तात्पुरते स्थलांतरही माढ्याबाहेर होणार नाही. मी याअगोदरही याबाबत स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे यावरून विनाकारण राजकारण करू नये. 
- आमदार बबनराव शिंदे 

माढ्यातील तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम होईपर्यंत तहसील कार्यालय माढ्यामध्येच एखाद्या इमारतीत हलविण्यात येईल. 
- ज्योती कदम,
प्रांताधिकारी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल