जिल्हा शिवसेनेत मरगळ ! आमदार सावंतांना सक्रिय होण्याचे द्यावेत आदेश : साईनाथ अभंगराव 

भारत नागणे 
Tuesday, 12 January 2021

येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, शिवसेनेला यश प्राप्त करण्यासाठी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी पक्षवाढीसाठी अधिक सक्रिय होण्याची गरज आहे. तसे आदेश पक्ष प्रमुखांनी द्यावेत, अशी मागणी पंढरपूर विभाग शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी महायुती सरकारच्या सत्ता काळात सोलापूर जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत केली. यापुढेही आमदार सावंत यांना सक्रिय होण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव यांनी केली आहे. 

आमदार सावंत यांनी मागील सरकारच्या काळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले. त्याबरोबरच शिवसेना पक्ष देखील तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्याचे काम केले. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी व सामान्य शिवसैनिक हे थेट आमदार तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधून काम करत होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून जिल्हा शिवसेनेत मरगळ आल्याचे दिसून येत आहे. येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, शिवसेनेला यश प्राप्त करण्यासाठी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी पक्षवाढीसाठी अधिक सक्रिय होण्याची गरज आहे. तसे आदेश पक्ष प्रमुखांनी द्यावेत, अशी मागणी पंढरपूर विभाग शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसे लेखी निवेदनही पाठवण्यात आले आहे. 

सोलापूर जिल्ह्यात शिवसेना वाढली पाहिजे, यासाठी प्रचंड तळमळ असलेले नेतृत्व म्हणून जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांच्याकडे पाहिले जाते. शिवसैनिकांमध्ये कुठलाही भेदभाव न करता एक आक्रमक व शिस्तप्रिय नेतृत्व म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सक्रिय होण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनात केली आहे. 

या निवेदनावर शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, शिवसेना तालुका प्रमुख महावीर देशमुख, शहर प्रमुख रवी मुळे यांच्या सह्या आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena District Liaison Chief MLA Tanaji Sawant is being demanded to be activated