esakal | 'पदवीधर- शिक्षक'मध्ये शिवसेनाच मोठा भाऊ ! 'महाविकास'चे दोन्ही उमेदवार विजयी; 'महापालिका'साठी ठरले सूत्र
sakal

बोलून बातमी शोधा

BjpShivsena

मुख्यमंत्री पदावरुन तुटलेली भाजप- शिवसेनेतील युती आणि मोठा भाऊ कोण, हा वाद कायमचा मिटवत शिवसेनेने परंपरागत राजकीय शत्रू असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत हात मिळवणी केली. भाजप- शिवसेनेने विरोधकांना पदवीधरची जागाच मिळू दिली नाही. मात्र, महाविकास आघाडीतून शिवसेनेने आपणच मोठा भाऊ होतो, हे सिध्द करुन दाखविले आहे.

'पदवीधर- शिक्षक'मध्ये शिवसेनाच मोठा भाऊ ! 'महाविकास'चे दोन्ही उमेदवार विजयी; 'महापालिका'साठी ठरले सूत्र

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री पदावरुन तुटलेली भाजप- शिवसेनेतील युती आणि मोठा भाऊ कोण, हा वाद कायमचा मिटवत शिवसेनेने परंपरागत राजकीय शत्रू असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत हात मिळवणी केली. भाजप- शिवसेनेने विरोधकांना पदवीधरची जागाच मिळू दिली नाही. मात्र, महाविकास आघाडीतून शिवसेनेने आपणच मोठा भाऊ होतो, हे सिध्द करुन दाखविले आहे. दोन्ही उमेदवार कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे असतानाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करीत दोन्ही उमेदवारांचा विजय सोपा केला.

राज्यात शिवसेना- भाजपची युती तर कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होती. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी, आम्ही महाराष्ट्रात पाहतो, तुम्ही दिल्लीत लक्ष द्या म्हणत युती टिकविली. मात्र, 2019 पूर्वीच्या निवडणुकांमध्ये मोठा भाऊ कोण? भाजप की शिवसेना? याचा वाद कायम राहिला.

भाजपने नरेंद्र मोदी यांना पुढे केले आणि कॉंग्रेससह अन्य पक्षांना पराभवाची धूळ चाखायला लावली. देशात 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर हवेत गेलेल्या महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने स्वत:च स्वत:ला मोठा भाऊ मानून शिवसेनेला डावलले. त्याचा राग बोलून न दाखविता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे 'वेट ऍण्ड वॉच' करीत राहिले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविल्यानंतर भाजपने मुख्यमंत्री पदाचा दावा केला. मात्र, शिवसेनेला अडीच वर्षाचे मुख्यमंत्री पद देण्याचे ठरलेले असतानाही भाजपने तसे ठरलेच नसल्याचे सांगितल्याने ठाकरे यांनी भाजपची मैत्री तोडून स्वतंत्र चूल मांडली. त्याचवेळी शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांना हात देत अचूक टायमिंग साधले. बाळासाहेबांसोबतचे मैत्रिपूर्ण संबंधाचा दाखला देत पवारांनी थेट उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री करीत शिवसेनेतील संभाव्य नाराजी व गटबाजीला पूर्णविराम दिला आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळविले.

'ज्यांच्या जागा सर्वाधिक त्यांचाच महापौर'
डिसेंबर 2021 नंतर राज्यातील बहुतांश महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी, शिवसेनेने युवा सेनेच्या माध्यमातून युवकांचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला असून त्यात जुन्या कार्यकर्त्यांनाही सोबत घेतले जात आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही अभिप्राय अभियानाच्या माध्यमातून कोणत्या मतदारसंघात अधिक लक्ष द्यावे लागेल, याचा अंदाज घेतला आहे. त्यानुसार त्यांनीही नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करायला सुरवात केली आहे. कॉंग्रेसही आगामी काही महिन्यांत नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करणार असल्याची चर्चा आहे. 'विकास'ची घडी कायम राहावी, सत्तेसाठी वाद निर्माण होऊ नयेत म्हणून 'ज्यांच्या जागा सर्वाधिक त्यांचा नगराध्यक्ष तथा महापौर' असे सूत्र अवलंबून आगामी निवडणुका लढविल्या जातील, अशीही शक्‍यता वर्तविली जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल