
सध्याच्या ठळक बाबी...
- सोलापूर महापालिकेच्या सात विषय समित्यांच्या निवडीसाठी आज अर्ज भरण्यास प्रारंभ
- शहर सुधारणा समितीतील शिवसेनेचे राजकुमार हंचाटे भाजपच्या गोटात
- "एमआयएम'ला मिळणाऱ्या दोन समित्यांपैकी एका समितीचा निर्माण झाला पेच
- वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी शहरवासीयांसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यास सांगितले
- सकाळी 11 ते दुपारी दीड वाजेपर्यंत विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी अर्ज करण्याची आज शेवटची मुदत
सोलापूर : भाजपच्या विरोधात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडीसोबत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने जाण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, वंचित आघाडीचे गटनेते यांनी पक्षाचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांना कोणासोबत जायचे, याबद्दल विचारणा केली होती. ऍड. आंबेडकर यांनी शहरवासीयांच्या प्रश्नांसाठी महाविकास आघाडीसोबत जाण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी मजबूत झाली, मात्र शिवसेनेचे राजकुमार हंचाटे हे भाजपच्या गोटात गेल्याने एमआयएमला मिळणाऱ्या शहर सुधारणा समितीचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता एमआयएम काय भूमिका घेणार, याची उत्सुकता लागली आहे.
महापालिकेतील सात विषय समित्यांपैकी एकच महिला व बालकल्याण समितीची मागणी एमआयएमने शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्याकडे केली. मात्र, शिवसेनेने दोन समित्या नको, पण महिला व बालकल्याण समिती आम्हाला राहू द्या, अशी भूमिका घेतली. आमदार संजय शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर एमआयएमने भूमिका नरम केली आणि एमआयएमला दोन समित्या देण्याचे ठरले. कॉंग्रेसला दोन, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्येकी एक समिती देण्याचे निश्चित झाले.
मात्र, शहर सुधारणा समितीचे सदस्य असलेले राजकुमार हंचाटे आज सकाळी भाजपच्या गोटात दिसल्याने एमआयएमला मिळणाऱ्या एका समितीबद्दल संभ्रम निर्माण झाला. आता तो पेच कसा सोडवायचा, याबद्दल महाविकास आघाडीचे नेते विचारमंथन करू लागले आहेत. उद्या (ता. 22) विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी होणार असून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हात वर करून मतदान होणार आहे. सुरवातीपासूनच "एकला चलो रे'च्या भूमिकेतील सत्ताधारी भाजप काय चमत्कार करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्याच्या ठळक बाबी...
संपादन : श्रीनिवास दुध्याल