शिवसेनेच्या झेडपी अध्यक्षाची महाविकास आघाडीच्या बैठकीला पुन्हा दांडी 

प्रमोद बोडके
Sunday, 22 November 2020

जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका गटाला भाजपच प्रिय 
जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये दोन गट असल्याचे आजच्या बैठकीतून समोर आले. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटातील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आजही भाजपच्याच जवळ असल्याचे वारंवार समोर येत आहे. अनिरुद्ध कांबळे हे भाजप व भाजप पुरस्कृत आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाचे शिवसेना जिल्हा परिषद सदस्य झेडपीच्या राजकारणात भाजपच्या सोबत आहेत. झेडपीच्या राजकारणात महाविकास आघाडीचा कुठेही ताळमेळ दिसत नाही. झेडपीतील शिवसेनेच्या बहुतांश सदस्यांना आजही भाजपच प्रिय असल्याचे वारंवार समोर येत आहे. 

सोलापूर : राज्याच्या सत्तेसाठी एकत्रित आलेली शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थानिक पातळीवर मात्र अद्यापही एकत्रित नसल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भाजप व भाजप पुरस्कृत स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मिळाले अनिरुद्ध कांबळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या बैठकीला आज गैरहजर राहिले. "मी शिवसेनेचाच आहे' असे सांगून मुंबईतील शिवसेना नेत्यांची सहानभूती मिळवणारे सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे स्थानिक राजकारणात मात्र महाविकास आघाडीपासून फटकून रहात असल्याचे दिसत आहे. 

महाविकास आघाडीच्या बैठकांना ते हजर राहत नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे नेमके कोणाचे? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीची संयुक्त सभा सोलापुरातील हेरिटेज लॉन्समध्ये झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, शिवसेनेचे नेते तथा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. 

या मेळाव्याला सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, संभाजी शिंदे, माजी आमदार दिलीप माने, सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे हे आवर्जून उपस्थित होते. शिवसेनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरविली. यापूर्वीही डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला त्यांनी दांडी मारली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena's ZP president resumes Mahavikas Aghadi meeting