esakal | मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ल्यात केला होता शिवरायांनी मुक्काम ! मात्र किल्ल्याच्या दुरवस्थेमुळे शिवप्रेमींचा संताप

बोलून बातमी शोधा

Mangalwedha Bhuikot}

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेतील मोहिमेवर जात असताना मंगळवेढ्यात सात दिवस मुक्काम केलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची बाहेरून पडझड होत असून, याकडे दुर्लक्ष होत असल्याने शिवप्रेमी नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. 

मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ल्यात केला होता शिवरायांनी मुक्काम ! मात्र किल्ल्याच्या दुरवस्थेमुळे शिवप्रेमींचा संताप
sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेतील मोहिमेवर जात असताना मंगळवेढ्यात सात दिवस मुक्काम केलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची बाहेरून पडझड होत असून, याकडे दुर्लक्ष होत असल्याने शिवप्रेमी नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. 

महाराष्ट्रातील गायक मंगळवेढ्याचे (स्व.) प्रल्हाद शिंदे यांनी गौरवशाली महाराष्ट्रात "मंगळवेढा भूमी संतांची' अशी ओळख लोकगीतामधून केली. या नगरीतील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांमुळे रत्नागिरी- नागपूर, टेंभुर्णी - विजयपूर या महामार्गामुळे पर्यटनाच्या संधी उपलब्ध होत असताना, पर्यटन खात्याच्या दुर्लक्षामुळे येथील भुईकोट किल्ल्याचे जतन होताना दिसत नाही. 

मंगळवेढ्यात चालुक्‍य, कलचुरी घराण्याची काही काळ राजधानी होती. विजापूरच्या आदिलशाहीच्या जवळकीमुळे नेहमीच हे ठिकाण त्या काळात महत्त्वाचे होते. 1665 मध्ये शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्या सोबत आदिलशाही विरुद्ध मोहीम काढली होती. त्यात 20 ते 27 डिसेंबर 1665 या दिवशी भुईकोट किल्ला व बाहेर 13 बुरूज आणि तटबंदी असल्याने सुरक्षित ठिकाण म्हणून मंगळवेढ्यातील किल्ल्यात मुक्काम केला. 

या वेळी नेताजीने मंगळवेढा किल्ला जिंकला. हा किल्ला विजापूरच्या जवळ होता. तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे मिर्झाराजे जयसिंगाने दिलेरखानाला किल्ला उद्‌ध्वस्त करण्याची आज्ञा केली. पुढील काळात मंगळवेढे पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेले. 1685 मध्ये औरंगजेब बादशाहाच्या बक्षीने उद्‌ध्वस्त झालेला किल्ला ताब्यात घेतला. साधारणत: 200 वर्षांपूर्वी डागडुजी करण्यात आली. 

सध्या किल्ल्याचे फारच थोडे अवशेष उरलेले आहेत. अनेक ऐतिहासिक प्राचीन अवशेष गावात विखुरल्याने किल्ल्याचे महत्त्व कमी झाले. आताच्या स्थितीत उभी असलेली वास्तू म्हणजे किल्ले वजा गढी आहे. चार मातीचे बुरुज आहेत. किल्ल्याचा खंदक नष्ट झालेला आहे. किल्ल्यात एका कोपऱ्यात काही कोरलेल्या मूर्ती, सप्त मातृकांची मूर्ती, गणपतीची मूर्ती पाहायला मिळतात. किल्ल्याच्या आताच्या अवशेषांवरून किल्ला आता आहे त्यापेक्षा मोठा असल्याचे संकेत मिळतात. परंतु सध्या बुरुजाची पडझड होत असल्याने याकडे दुर्लक्ष केल्यास हा ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढीस पाहण्यास मिळणार नाही. 

किल्ला कधी बांधला याची माहिती उपलब्ध होत नाही; मात्र किल्ल्याची जबाबदारी राज्य की केद्र शासनाची? हे निश्‍चित करून किल्ल्याची भिंत 13 फूट रूंद असल्याने त्यावर स्लॅब टाकून किल्ला वरून पाहता येईल अशी व्यवस्था करावी. तालुक्‍यात विस्कटलेल्या पुरातन मूर्ती एकत्रित जतन केल्यास तालुक्‍याचा इतिहास पुढील पिढीस माहिती होईल. 
- अप्पासाहेब पुजारी, 
इतिहास संशोधक, मंगळवेढा 

छत्रपती शिवराय हे अखंड मानव मनाचे प्रेरणास्थान आहेत. शिव मुक्‍काम दिन मोठ्या दिमाखात साजरा करतात. कारागृह, भूमी अभिलेख, प्रांताधिकाथी, सार्वजनिक बांधकाम या कार्यालयांची दुरुस्ती होते. त्याप्रमाणे हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या आश्वारूढ पुतळ्याचा व किल्ला संवर्धनाचा मानस असून, शहर व तालुक्‍यातील शिवप्रेमी नागरिक लोकवर्गणी व श्रमदान करून या किल्ले संवर्धनात मोलाचे सहकार्य करतील. 
- ज्ञानेश्वर कोंडूभैरी, 
अध्यक्ष, सार्वजनिक शिवजयंती मंडळ 

मंगळवेढ्याचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने संतभूमीत तीर्थक्षेत्र विकास निधीसाठी प्रयत्न सुरू आहेत. किल्ला संवर्धनासाठी नगरपालिकेच्या वतीने शासनास प्रस्ताव पाठवून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 
- अरुणा माळी, 
नगराध्यक्षा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल