Video : हजारो महिलांच्या उपस्थितीत रंगला शिवजन्मोत्सव

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

शिवजन्मोत्वाचा पाळण्याचा सोहळा वीरमाता आणि वीरपत्नींच्या उपस्थितीत मंगळवारी मध्यरात्री 12 वाजता झाला. भगवे झेंडे, पारंपरिक वेशभूषेसह बाल शिवाजीच्या रूपात आलेली बालके आणि तरुणाई यावेळी लक्ष वेधत होती. 

सोलापूर : "जय भवानी... जय शिवाजी...'चा जयघोष, "तुमचं आमचं नातं काय... जय जिजाऊ... जय शिवराय' अशी शिवप्रेमींकडून एकमेकांना घातली जाणारी साद... असा शिवमय माहोल सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी (ता.18) मध्यरात्री निर्माण झाला होता. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जमलेल्या सर्वधर्मीय महिला, वृद्ध, मुले, तरुण, तरुणी यांचा उत्साह गगनाला भिडल्याचे जाणवले. यंदाच्या सोलापुरातील शिवजन्मोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यरात्री झालेला पाळण्याचा सोहळा! 
शिवजन्मोत्वाचा पाळण्याचा सोहळा वीरमाता आणि वीरपत्नींच्या उपस्थितीत मंगळवारी मध्यरात्री 12 वाजता झाला. भगवे झेंडे, पारंपरिक वेशभूषेसह बाल शिवाजीच्या रूपात आलेली बालके आणि तरुणाई यावेळी लक्ष वेधत होती. सोलापुरात एसटी बस स्टॅंड परिसरातील छत्रपती शिवाजी पुतळा येथे शिवजन्मोत्सवाची तयारी करण्यात आली होती. यंदा प्रथमच जन्मोत्सवाचा पाळणा होणार असल्याची वार्ता शहर व परिसरात पसरली होती. त्यामुळे विविध भागातून महिला, पुरुष, तरुणाईची पावले शिवाजी चौकाकडे वळाली. श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती

महामंडळातर्फे शिवजन्मोत्सवानिमित्त हा पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या शिवजन्मोत्सव पाळण्यासाठी हजारो महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवला. रात्री ठीक 12 वाजता पाळणा सोहळा पार पडला. मंगळवारी रात्री साडेदहापासूनच शहर व हद्दवाढ भागांतून विविध वाहनांतून सर्वधर्मीय महिला व तरुणी गटा- गटाने शिवाजी चौकाकडे येत होत्या. शिवाजी पुतळा परिसर फुलांच्या माळांनी व विद्युत रोषणाईने झगमगत होता. या वेळी वीरमाता व वीरपत्नींच्या उपस्थितीत रात्री 12 वाजता पाळणा कार्यक्रम पार पडला. हजारो महिलांनी एकसाथ शिवरायांचे पाळणा गीत सादर केले. पाळणा कार्यक्रम पार पडल्यानंतर फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. भगवे फेटे व भगव्या झेंड्यांमुळे परिसरात शिवसृष्टीच अवतरली होती. पाळणा कार्यक्रमानंतर उपस्थितांना लाडू बुंदीचा प्रसाद वाटण्यात आला. विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले. पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता. महापालिका परिवहन विभागाने विविध 13 ठिकाणांहून महिलांना ने-आण करण्यासाठी बससेवा दिली होती. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivjayanti in Solapur with great enthusiasm