शिवसेनेचे हंचाटे, मगर भाजपच्या वाटेवर? ! विषय समित्यांमधील पराभवानंतर गुर्रम यांची विभागीय आयुक्‍तांकडे धाव

4congress_shivsena_bjp.jpg
4congress_shivsena_bjp.jpg

सोलापूर : विषय समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेशी बंडखोरी करुन भाजपला साथ देणारे शिवसेनचे नगरसेवक राजकुमार हंचाटे व नगरसेविका अनिता मगर यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालावी म्हणून मिरा गुर्रम यांनी विभागीय आयुक्‍तांकडे धाव घेतली आहे. त्यांच्या बंडखोरीमुळेच माझा पराभव झाला, अशी भूमिका त्यांनी घेतली असून त्यावर मंगळवारी (ता. 9) सुनावणी आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांना डावलून गुर्रम या विभागीय आयुक्‍तांकडे गेल्याच कशा, त्यावर पक्षातील नेत्यांनी ठोस भूमिका न घेतल्यास पक्षांतर करण्याचा इशारा दोन्ही नगरसेवकांनी दिला आहे.

जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांच्या भूमिकेकडे लक्ष
शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी संख्याबळ असतानाही विषय समित्यांच्या सभापती निवडीत सोयीची भूमिका घेतली. एमआयएमसह अन्य पक्षांना मदत करावी, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, त्याविरोधात भूमिका घेत हंचाटे आणि मगर यांनी भाजपसोबत जाणे पसंत केले. या पार्श्‍वभूमीवर पक्षाचा आदेश डावलल्याने अद्याप पक्षाकडून काहीच कारवाई त्यांच्यावर झालेली नाही. परंतु, पक्षाचे कोणतेही पद नसतानाही शहरप्रमुख व जिल्हाप्रमुखांच्या परस्पर गुर्रम यांनी विभागीय आयुक्‍तांकडे धाव घेतली आहे. याबद्दल पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्यांचा अर्ज मागे न घेतल्यास आम्ही कोणत्या पक्षात जायचे, याचा नक्‍की विचार करु, असे दोन्ही नगरसेवकांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे आता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचा दारूण पराभव झाला. त्यासाठी पक्षातील नगरसेवकांनी भाजपला साथ दिल्याचा फटका पक्षाला सोसावा लागला. त्यानंतर जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी संबंधित नगरसेवकांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करावी, या उद्देशाने वरिष्ठ नेत्यांशी पत्रव्यवहार केला. मात्र, त्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी पक्षांतर केल्याने आता परिस्थिती बदलली असून कारवाई करायची की नाही, याबाबत पक्ष भूमिका घेईल, असे बरडे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. तत्पूर्वी, सर्वात महत्त्वाची महिला व बालकल्याण समिती शिवसेनेला मिळावी आणि दोन समित्या एमआयएम, दोन समित्या कॉंग्रेस आणि वंचित बहूजन आघाडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्येकी एक समिती देण्याची भूमिका कोठे यांनी घेतली. मात्र, शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने दोन समित्या घेऊन पक्षातील दोघांना संधी द्यावी, अशी भूमिका नगरसेवक हंचाटे यांनी घेतली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि अनिता मगर आणि राजकुमार हंचाटे यांनी उघडउघड भाजपला मदत केली. विशेष म्हणजे मगर या भाजपकडून सभापती झाल्या. परंतु, त्यांनी बंडखोरी केल्याने आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, असे गुर्रम यांचे मत आहे.


कॉंग्रेसचे शहराध्यक्ष हंचाटेंना भेटले
पक्षातील अंतर्गत कुरघोडीमुळे अस्वस्थ झालेले राजकुमार हंचाटे यांनी कॉंग्रेसमध्ये यावे, यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. शहर मध्य विधानसभा मतदारसंघात हंचाटे यांची ताकद आहे. आगामी महापालिका व विधानसभा निवडणुकीत त्यांचा कॉंग्रेसला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे शहराध्यक्ष प्रकाश वाले व गटनेते चेतन नरोटे यांनी काही दिवसांपूर्वी हंचाटे यांची भेट घेतली. दुसरीकडे आमदार विजयकुमार देशमुख यांनीही त्यांना पाठबळाचे आश्‍वासन देऊन भाजपमध्ये येण्याचा आग्रह धरल्याची चर्चा आहे. आता दोन्हीपैकी हंचाटे कोणत्या पक्षात जातात की शिवसेनेतच राहणार, हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com