धक्कादायक बातमी ! सोलापुरातील 'सारी'च्या रुग्णांना झालाय कोरोना

तात्या लांडगे
Tuesday, 21 April 2020

ठळक बाबी....

  • सोलापुरातील पाच्छापेठ, रविवार पेठ, बापूजी नगर, इंदिरा नगर, शेळगी, कुर्बान हूसेन नगर परिसर सील
  • आतापर्यंत सोलापुरात आढळले कोरोनाबाधित २५ रुग्ण; दोघांना झाला ,सारी' हा आजार
  • बापूजी नगर, कुर्बान हूसेन नगरातील सारीबाधित रुग्णांना झालाय कोरोना
  • बाधित रुग्णांच्याच्या संपर्कातील १६२ व्यक्तींचे अहवाल अद्याप अप्राप्त
  • परराज्यातून रविवार पेठेत आलेल्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी घेतले ताब्यात

सोलापूर : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही त्या विषाणूपासून ११ एप्रिलपर्यंत दूर असणारे सोलापूर शहर १० दिवसांत रेड झोनमध्ये दाखल झाले. सोमवारी (ता. २०) शहरातील विविध भागात तब्बल १० रुग्ण सापडले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यामधील बापूजी नगर व कुर्बान हुसेननगरातील दोघांना 'सारी' हा आजार झाल्याचे समोर आले. ते कोरोना पॉझिटिव्हदेखील आहेत, अशी माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.

सोलापूर शहर- जिल्ह्यातील एक हजार १९५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६८८ व्यक्ती विविध ठिकाणी सरकारी यंत्रणेच्या निगराणीखाली ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोमवारी (ता. २०) सोलापुरात एकदम दहा रुग्ण सापडल्याने अनेकांची चिंता वाढली होती. आता मंगळवारी (ता. २१) किती अन् कोणत्या भागात रुग्ण वाढणार, याची चिंता सर्वांना लागली होती. मात्र, रुग्णसंख्या व प्राप्त अहवालाची माहिती सांयकाळी दिली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सारी व कोरोना या दोन्ही आजारांची लक्षणे एकच असल्याने सर्दी, खोकला, ताप असलेल्यांनी तत्काळ सरकारी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, मंगळवारी शहरात रविवार पेठ येथे परजिल्हयातून आलेल्या व्यक्तीस वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

ग्रामीण भागाकडेही लक्ष असू द्या
लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर कोरोनाच्या भितीने मुंबई, पुण्याला स्थलांतरित झालेल्यांनी गाव गाठले. नाकाबंदी, सीमा बंदी असतानाही ७० ते ८० हजार लोक गावोगावी दाखल झाले. त्यानंतर गावोगावी आलेल्यांची माहिती संकलित करुन त्यांची नियमित विचारपूस व्हावी, या हेतूने ग्राम समित्या स्थापनेचा निर्णय सरकारने घेतला. तर तालुका, शहरांमध्येही अशा समित्या असाव्यात असे सरकारने स्पष्ट केले. मात्र, त्या समित्यांमधील काही सदस्यांनी (कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच व अन्य) स्वतःच्या घरात लॉकडाउन राहणे पसंद केले. जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधिक्षकांनी आदेश काढूनही त्याचा काही परिणाम झाल्याचे दिसत नाही. आजही अनेक गावांमध्ये (सावळेश्वर ता. मोहोळ), रानमसले ता. उत्तर सोलापूर) छोटा -मोठा बाजार भरत असून त्याठिकाणी कोणतेही नियम पाळले जात नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking news Corona suffers from Sari patients in solapur