जवळच्या दुकानदाराला सांभाळा, तो तुम्हाला सांभाळेल 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 March 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शहरांच्या सीमा बंद झाल्याने ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय ग्राहक पुन्हा एकदा स्थानिक नजीकच्या किराणा दुकानांकडे वळला आहे. वळसंगसारख्या (ता. दक्षिण सोलापूर) शहरापासून जवळ असलेल्या गावातील मध्यमवर्गीय ग्राहकांची संख्या मोठी आहे.

वळसंग (सोलापूर) : ऑनलाइन कंपन्या व मॉलमधील शिल्लक डिस्काउंटच्या लोभापायी आपल्या जवळच्या दुकानदाराला डावलून दूर गेलेल्या ग्राहकांना शेवटी जवळचा दुकानदाराच कामाला येतोय. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शहरांच्या सीमा बंद झाल्याने ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय ग्राहक पुन्हा एकदा स्थानिक नजीकच्या किराणा दुकानांकडे वळला आहे. वळसंगसारख्या (ता. दक्षिण सोलापूर) शहरापासून जवळ असलेल्या गावातील मध्यमवर्गीय ग्राहकांची संख्या मोठी आहे. हा ग्राहकवर्ग शहरातील मोठ्या बाजारपेठा, शॉपिंग मॉल यांच्या आहारी गेला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील किराणा दुकानदारीला घरघर लागली होती. नोटबंदी, जीएसटी यामुळे दुकानदारांचे कंबरडे मोडले होते. दरमहा हमखास खरेदी करणारा मध्यमवर्गीय ग्राहक वर्ग किराणा दुकानदारांपासून दूर केला होता. हल्ली ग्रामीण भागात मोठ्या संख्येने दुचाकी असल्याने प्रत्येकजण खरेदीसाठी शहराकडे धावत होता. मात्र, कोरोनाची संचारबंदी लागली तेव्हापासून शहरात खरेदीसाठी जाणाऱ्या दुचाक्‍या थांबल्या आहेत. 22 मार्चपासून शहरे बंद झाल्याने वळसंगसारख्या गावातील किराणा दुकानदार आजूबाजूच्या 10 ते 12 खेड्यांतील ग्राहकांची गरज भागवत आहेत. शासनाने नेमून दिलेल्या वेळेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत येथील दुकानदार ग्राहकांची अडली वेळ पाहून आवश्‍यक तो किराणा माल उपलब्ध करून देत आहेत. ग्रामीण भागातील दुकानदार महिना, दीड महिन्याच्या उधारीवर ग्राहकांना किराणा माल देत असतात. अडीअडचणीला घरातील लहान मुले जरी दुकानात गेली तरी कोणत्याही प्रकारची फसवणूक न करता योग्य ते सामान देत असतात. वळसंगसारख्या कानडी भागात तमतम (आपापल्या) मंदी बल्ली (लोकांजवळ) खरेदी माडरी (खरेदी करा) हा संदेश सध्या व्हायरल होत आहे. एका अर्थाने मॉल खरेदी व ऑनलाइन खरेदीचा उत्साह मावळला असून घरालगत असलेल्या किराणा दुकानदारांच्या सेवेकडे प्रत्येकजण वळाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shopping in rural area shops due to Corona